मुंबई: “देवेंद्रला मी लहानपणापासून ओळखतो. ते असं कोणावर कधीही बोलणार नाहीत, तसा त्यांचा स्वभाव नाही. साम दाम दंड भेद म्हणजे सर्व ताकद लावा असा अर्थ होतो”, असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ऑडिओ क्लिपप्रकरणात मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली.

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत नितीन गडकरींनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली.

यावेळी गडकरींनी शिवसेनेसोबत युती राहायली हवी, असं मत व्यक्त केलं. तर पेट्रोल-डिझेल दरवाढीवरही भाष्य केलं.

मुख्यमंत्र्यांची पाठराखण

पालघर पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऑडिओ क्लिपबाबत नितीन गडकरींना विचारण्यात आलं. त्यावर गडकरी म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांना मी लहानपणापासून ओळखतो. ते असं कोणावर कधीही बोलणार नाहीत, तसा त्यांचा स्वभाव नाही. ते सुसंस्कृत आहेत. त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी साम दाम दंड भेदचा वापर करा याचा अर्थ सर्व ताकद लावा असा होतो”

पालघरमधील प्रचारसभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप जारी केली होती. त्यामध्ये मुख्यमंत्री आपल्या कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी साम दाम दंड भेदचा वापर करा असं म्हटले होते. तर सेनेने ही क्लिप अर्धवट दाखवल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता.

ईव्हीएम

पालघर निवडणुकीत अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडले, याबाबतची गडरींनी मत व्यक्त केलं.

“निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र यंत्रणा आहे. मशीन बंद पडणे ही बाब निवडणूक आयोगाने गंभीर्याने घ्यायला हवं. मात्र पंजाबमध्ये काँग्रेस जिंकल्यावर ईव्हीएम योग्य, उत्तर प्रदेशात हरल्यावर त्यात गडबड कशी?” असा सवालही गडकरींनी उपस्थित केला.

ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटमध्ये काही गडबड वाटत असेल, तर त्याबाबत निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावं.

पेट्रोल-डिझेल दरवाढ

यावेळी नितीन गडकरींना दररोज होणाऱ्या पेट्रोल-डिझेल भाववाढीबद्दलही विचारण्यात आलं.  त्यावर गडकरी म्हणाले, पेट्रोल- डिझेलचे भाव वाढत जरी असले करी टमाटर, कांदा, बटाट्याचे भाव कमी होत आहेत.

पेट्रोल-डिझेलचे दर वाढत होते, त्यावेळी आम्हीही आंदोलनं केली. मी भाजपचा अध्यक्ष होतो, तेव्हा अनेक आंदोलनं केली. त्याच कारण म्हणजे आम्ही त्यावेळी विरोधात होतो.

आम्ही इंधनावरील सबसिडी बंद केली. अनेक विकासकामांवर पैसे खर्च केले. आता आम्ही जैविक इंधन, इलेक्ट्रिक वाहने अशा पॉलिसी आणत आहोत. पेट्रोलियम मंत्रालय 5 मोठे इथेनॉल प्लँट उभारत आहेत. स्वस्त, पर्यावरणपूरक इंधन आम्ही भारतातच तयार करु. इथेनॉल, इलेक्ट्रिक वाहनांमुळे इंधन दरकपात होतील.

इंधन जर GST च्या कक्षेत आलं तर पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील. राज्यांनाही फायदा होईल. सध्या देवेंद्र फडणवीस यांनी तशी मागणीही केली आहे. येत्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत त्याबाबत निर्णय होऊ शकतो, असं गडकरींनी सांगितलं.

शिवसेनेशी युती राहावी

"शिवसेनेसोबत युती आहे आणि युती राहिली पाहिजे. हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर आमची शिवसेनेसोबत युती आहे. थोडं फार कधी तरी इकडे तिकडे होतं. तुझं माझं जमेना तुझ्याविना करमेना, अशी मराठीत म्हण आहे. पण युती राहिली पाहिजे", असं गडकरी म्हणाले.

प्रणव मुखर्जी संघाच्या कार्यक्रमाला येणार?

आरएसएसच्या कार्यक्रमाला कोणी यायचं आणि जायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला असं वाटतं एकमेकांच्या भेटीगाठी घ्यायला पाहिजे. संघ काही पाकिस्तानची संघटना आहे का? आपल्याच देशातली आहे. जर प्रणव मुखर्जी आले तर आम्ही स्वागत करु, असं गडकरी म्हणाले.

स्वस्त घरं

भिकाऱ्यालाही घर विकत घेता येईल, अशी घरं मी नागपूरमध्ये बांधत आहे. ज्यामध्ये गरम पाण्यापासून- सोफा, बेड फुकट दिला जाणार आहे. ज्याची किंमत फक्त 3 लाख 50 हजार इतकी असणार आहे, असं गडकरींनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्रीसाहेब, साम-दाम-दंड-भेदचा अर्थ समजावून सांगा : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांची कथित ऑडिओ क्लिप सादर

जनाची नाही, मनाची तरी ठेव, मुख्यमंत्र्यांचं आदेश बांदेकरांवर टीकास्त्र

पालघर LIVE : पैसे वाटपप्रकरणी 12 जणांवर गुन्हा

'क्लिप खरी असेल तर फडणवीसांचा राजीनामा घ्या, खोटी असल्यास उद्धव ठाकरेंवर कारवाई करा'

पालघर पैसे वाटप: सेनेचे दिग्गज नेते रात्री 2 वा. डहाणू पोलिसात