मुंबई : मागच्या काही वर्षांच्या तुलनेत मुंबईतील ध्वनी प्रदूषणात घट झाल्याचं बघायला मिळत आहे. यासंदर्भातला अहवाल आज आवाज फाऊंडेशनकडून प्रकाशित करण्यात आला.  वांद्रे, माहिम, वरळी, शिवाजी पार्क, बाबुलनाथ आणि मरीन ड्राईव्ह परिसरात ध्वनी प्रदूषणात घट झाल्याचं समोर आलं आहे. या वर्षी मोठ्या प्रमाणात प्रदूषणाविरोधात मोहिम राबवण्यात आल्याने आणि नागरिकांमध्ये हरित फटाक्यांसंदर्भात जनजागृती केल्याने ध्वनीप्रदूषणात घट झाल्याचं बघायला मिळालं. 


शिवाजी पार्क परिसरात सर्वाधिक डेसिबलची नोंद झाली ज्यात फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे 100.4 डेसिबलची नोंद करण्यात आल्याचं अहवालात म्हंटलं आहे. दरम्यान असं असलं तरी रात्री 10 नंतर देखील फटाक्यांची आतिषबाजी ह्या परिसरात चालूच असल्याची देखील नोंद करण्यात आली आहे. या परिसरात पोलिसांची उपस्थिती तर नव्हतीच सोबतच  पोलिसांकडून पेट्रोलिंग देखील करण्यात आली नसल्याचं अहवाल सांगतो. 


शाबास मुंबईकर! मुंबईत दिवाळीत गेल्या 17 वर्षातील सर्वात कमी ध्वनी प्रदूषण


दुसरीकडे मरीन ड्राईव्ह परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त बघायला मिळाल्याने ध्वनी प्रदूषण ह्या भागात झाले नाही. 2019 सालाआधीपर्यंत मरीन ड्राईव्ह परिसर हा फटाक्यांच्याआतिषबाजीसाठी केंद्रबिंदू असायचा. मात्र यावर्षी मरीन ड्राईव्ह परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्याने शुकशुकाट बघायला मिळाला. 2019 साली मरीन ड्राईव्ह परिसरात 112.3 डेसिबलची नोंद झाली होती तर 2020 साली देखील 105.3 डेसिबलची नोंद करण्यात आली होती. 



शहरातील इतर ठिकाणी जेथे आवाज मोजला गेला तेथे तुरळक फटाक्यांचा वापर होता जो रात्रीपर्यंत चालूच होता असं आवाज फाऊंडेशनच्या अहवालात म्हंटलंय. बहुतेक ठिकाणी हरित फटाके वापरले गेल्याने तुलनेने आवाजाची पातळी पारंपरिक फटाक्यांपेक्षाकमी होती. ह्यात प्रामुख्याने अनार, सुरसुरी, चक्री, राॅकेट आणि काही हवेत जाणाऱ्या फटाक्यांच्या समावेश होता.