Edible Oil Price: महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडले असताना दुसरीकडे केंद्र सरकारने मोठा दावा केला आहे. खाद्य तेलाच्या किंमतीत घट झाली असल्याचे खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशू पांडे यांनी म्हटले आहे. अनेक ठिकाणी खाद्य तेलाच्या किंमतीत 20, 18, 10 आणि 7 रुपयांची कपात झाली असल्याचे त्यांनी म्हटले. यामध्ये सुर्यफूल, शेंगदाणा, सोयाबिन आदी प्रमुख तेलांचा समावेश आहे.
सणांच्या आधीच तेलाच्या किंमतीत घट
सण-उत्सवाच्या काळात ग्राहकांना दिलासा देण्यासाठी अदानी विल्मर आणि रुचि सोया इंडस्ट्रीजसह प्रमुख खाद्य तेल कंपन्यांनी घाऊक किंमतीत 4 ते 7 रुपये प्रति लीटर कपात केली होती. त्यानंतर इतर कंपन्यांकडूनही असाच निर्णय घेतला जाण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. सॉल्वेंट एक्सट्रॅक्टर्स एसोसिएशनने (एसईए) म्हटले की, जेमिनी एडिबल्स अॅण्ड फॅट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (हैदराबाद), मोदी नॅच्युरल्स (दिल्ली), गोकुळ रिफॉइल्स अॅण्ड सॉल्वेंट लिमिटेड (सिद्धपूर), विजय सॉल्वेक्स लिमिटेड (अल्वर), गोकुळ अॅग्रो रिसोर्सेज लिमिटेड आणि एनके प्रोटिन्स प्रायव्हेट लिमिटेड (अहमदाबाद) या कंपन्यांनी घाऊक दरात कपात केली आहे.
मोफत रेशन योजनेला मुदतवाढ नाही
खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्यावतीने सुरू असलेली मोफत रेशन योजनेला मुदतवाढ देण्याबाबतचा कोणताही प्रस्ताव नाही. पंतप्रधान गरीब कल्याण योजना 30 नोव्हेंबरनंतर पुढे सुरू ठेवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. देशाची अर्थव्यवस्था रुळावर येत आहे. त्यामुळे मोफत रेशन देण्याच्या योजनेस मुदतवाढ देण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.
करोना महासाथीच्या पहिल्या लाटेच्या काळात देशभरात लॉकडाउन लागू करण्यात आला होता. त्यावेळी ८० कोटी गरजू लोकांपर्यंत मोफत रेशन देण्याची घोषणा केंद्र सरकारने दिली होती. अनेक गरीब घटकांना या योजनेचा लाभ झाला असल्याचे म्हटले जाते. ही योजना सुरुवातीच्या काळात तीन महिन्यांसाठी लागू करण्यात आली होती. त्यानंतर सातत्याने योजनेला मुदतवाढ मिळाली. दिवाळीपर्यंत या योजनेची मुदत वाढवण्याची घोषणा करण्यात आली होती.