Narayan Rane PC : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत. फटाके हे फोडण्यासाठीच असतात, पण मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितलं की, फटाके फोडा पण आवाज न करता आणि धूर न सोडता फोडा. मला वाटतं धूर न सोडणारे फटाके फक्त महाविकास आघाडीच्याच दुकानात मिळतात, असं म्हणत नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांसह थेट महाविकास आघाडी सरकारवरही निशाणा साधला. तसेच, पुढे बोलताना आज बारामतीत राष्ट्रवादीच्या दिवाळी मेळाव्याबाबतही नारायण राणेंनी पवारांवर टीका केली. आज बारामतीत फुटलेल्या फटाक्याचा आवाजही नव्हता, असं म्हणत राणेंनी थेट शरद पवारांवर निशाणा साधला. 


देशात विधानसभा आणि लोकसभेच्या काही पोटनिवडणुका पार पडल्या. त्याबाबत बोलताना नारायण राणे म्हणाले की, "देशात काही दिवसांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये दादरा हवेलीची एक जागा अपक्ष उमेदवारानं जिंकली. शिवसेनंनं मात्र डंका सुरु केला आम्ही जिंकलो, महाराष्ट्राबाहेर आम्ही जिंकलो. त्या जिंकलेल्या उमेदवाराची निशाणी मी मुद्दाम मागवून घेतली. ती निशाणी एक फलंदाज बॅट घेऊन उभा आहे, अशी निशाणी आहे. डेलकरांची निशाणी धनुष्यबाण नव्हती. पण दुसऱ्यांच्या मुलांचं बारसं करायची सवय शिवसेनेला आहेच. तो खासदार उद्या भाजपमध्येही येऊ शकतो. तसं तो उमेदवार निवडून आला आणि त्याबाबत शिवसेना आम्हाला मोठं यश मिळालं, आता आम्ही दिल्ली काबीज करणार, असं म्हणत सुटली. हे लिखाण करताना मला वाटतं भान नसणार संजय राऊतांना. रात्री जे करायचं ते दिवसा केल्यामुळे असा परिणाम होतोय का? माहित नाही."


नारायण राणे पुढे बोलताना ते म्हणाले की, "मोदी सरकार बहुमतात आहे, तुम्ही तिथे धडक मारणार, पण धडक कशी असते ते माहीत नाही वाटतं. दिल्लीला धडक मारायला आलात तर डोकं राहणार नाही जागेवर. डोक्याविना संजय राऊत दिसेल तिकडे. भाजपवर, मोदींवर टीकेचा भडिमार करतायत, संपलं आता यांचं म्हणे. आता तुम्ही जे 56 आमदार आहात, ते मोदींमुळेच निवडणून आलेले आहात. अन्यथा आठच्यावर जात नाहीत तुम्ही. ही मोदींची मेहरबानी."


उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होण्यापूर्वी शरद पवारांबाबत केलेली वक्तव्यही नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत वाचून दाखवली. त्यानंतर पुढे बोलताना ते म्हणाले की, "भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून, गद्दारी करुन मुख्यमंत्रीपद मिळवलं. जगाच्या पाठीवर असा मुख्यमंत्री झाला नाही. आज ढिंढवडे निघतायत. काय बोलताय, काय करताय? मुख्यमंत्री बारामतीला गेले. त्यावेळी शेतकरी प्रश्न, एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन त्यावर बोलावं. काहीच बोलले नाही. नुसती टिंगल टवाळी." 


"मुख्यमंत्री होण्यापूर्वी उद्धव ठाकरे म्हणाले होते की, शरद पवारांसारखा लाचारपणा आमच्या रक्तात नाही. त्यानंतर त्याच शरद पवारांकडे लाचार होऊन जाऊन मुख्यमंत्री पद स्विकारलं. त्यानंतर शरद पवारचं आपले सर्वकाही आहेत. त्यांच्यामुळेच आपल्याला मुख्यमंत्री पद मिळालं, असं उद्धव ठाकरे सांगतायत.", असं म्हणत महाविकास आघाडी स्थापनेपूर्वी उद्धव यांनी पवारांवर केलेल्या वक्तव्याची नारायण राणेंनी आवर्जुन आठवण करुन दिली आहे.