मुंबई : मुंबईतील गोरेगाव भागातल्या जेमस्टोन एक्स्पोतून 34 लाखांचा हिरा चोरणाऱ्या दोघा चिनी नागरिकांना
पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तीन तासांच्या आत मुंबई विमानतळावर दोघांना अटक करण्यात आली. दिल्लीमार्गे ओसाका आणि हाँगकाँगला पळून जाण्याच्या बेतात असलेल्या दोघांना सोमवारी पोलिसांनी पकडलं.


जेमस्टोन एक्स्पोच्या सुरक्षारक्षकांपासून पोलिसांपर्यंत आणि इमिग्रेशन, विमानतळावरील अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांच्या समन्वयामुळे हे शक्य झालं. एका लहानशा हँडबॅगेतील शॅम्पूच्या बाटलीत 5.4 कॅरेट डायमंड हस्तगत करण्यात आला. मँडरिन भाषांतरकारांच्या मदतीने दोघा चिनी आरोपींची चौकशी करण्यात आली. दोघांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे त्यांची धरपकड करणं वेगाने शक्य झालं.

सोमवारी दुपारी 3.45 वाजताच्या सुमारास 'जेम ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन काऊन्सिल'ने पी कीर्तीलाल या एक्झिबिटरकडे हिऱ्याची चोरी झाल्याची तक्रार सीआयएसएफना केली. 45 वर्षीय डेंद झिओबो आणि 47 वर्षीय जिअँग चॅँकिंग हे डील करण्याच्या बहाण्याने आपल्याकडे आले. हातचलाखी करत खऱ्या हिऱ्याची खोट्या हिऱ्याशी अदलाबदल केल्याचं त्यांनी सांगितलं.

डायमंड एक्स्पो हा भारतासाठी अत्यंत सन्मानाचा सोहळा होता. त्यामुळे हिरा परत मिळवणं अत्यंत महत्त्वाचं
असल्याचं केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालकांनी सांगितलं. 27 ते 31 जुलै या कालावधी गोरेगावमधील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये हा आंतरराष्ट्रीय ज्वेलरी शो पार पडला. फक्त निमंत्रितांनाच या शोमध्ये प्रवेश देण्यात आला होता. एका तिकीटाची किंमत 9 हजार रुपयांपर्यंत होती.