माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तर मोपलवारांचं तातडीनं निलंबन करा अन्यथा सभागृह चालू देणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.
मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राधेश्याम मोपलवारांना सर्व महत्त्वाची पदं ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात मिळाल्याचा दावा केला. तसंच त्यावेळी तुम्ही झोपला होता का, असा सवाल त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांना केला.
समृद्धी महामार्गाचे आंदोलक शेतकऱ्यांच्या ग्रुपवर एक ऑडिओ क्लिप फरत आहे. शेतकऱ्यांच्या मते या ऑडिओ क्लिपमध्ये मोपलवार आणि एक मध्यस्थ यांच्यात एका इमारतीच्या बांधकामावरून सेटलमेंट सुरु आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांचे सवाल
"मुख्यमंत्र्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कालपासून एका चॅनेलवर बातमी चालते आहे.मात्र अद्यापपर्यंत मोपलवारांना कुणीही बोलवलं आहे का? काही विचारलं आहे? दोन महिने चौकशीला लागतील तोवर त्यांना कुणीच काही विचारणार नाही का?
समृद्धी महामार्गाच्या जमीन अधिग्रहणावर तसंही प्रश्नचिन्ह आहे. प्रकाश मेहतांवरही काही कारवाई नाही...म्हणजे दाल में कुछ काला है. मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेवर प्रश्न चिन्ह उपस्थित झालेलं आहे.
सरकारने त्या अधिकाऱ्याला बोलवण्यात आले आहे का? अजून तो अधिकारी त्या पदावर कसा काय बसून आहे? मंत्रालयात पैसे कोणाला दिले जातात? चपराशी किंवा ड्रायव्हरला तर पैसे दिले जात नाही ना?" असे अनेक सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी उपस्थित केले.
मुख्यमंत्र्यांचं निवदेन
मोपलवारांच्या ऑडिओ संभाषणाची माहिती घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीअंती योग्य ती कारवाई केली जाईल.
अधिकाऱ्यावरचे सर्व आरोप हे तुमच्या काळातले आहेत. मी बाबांना विचारतो, तुम्ही का झोपला होता तेव्हा? त्यांना सर्व महत्वाची पदं तुमच्या काळात मिळाली आहेत. एका महिन्यात या सर्व प्रकरणाची चौकशी केली जाईल, दोषी आढळले तर कारवाई केली जाईल.
मोपलवारांवर लावलेले सगळे आरोप तुमच्या काळातले आहेत. तुम्हाला कशी झोप लागली. तुम्हीच त्यांना वेऴोवेळी इतर विभागांत वसवलं. एक महिन्याच्या आत चौकशी पूर्ण करून कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
विखे पाटील काय म्हणाले?
चौकशी होईपर्यंत किमान मोपलवारांना पदावरून बाजूला करा, तसंच गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनाही पदावरून हटवण्यात यावं, अशी मागणी विखे पाटील यांनी केली.
- मोपलवार भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले आहेत, त्यांनी विदेशामध्ये बेकायदेशीरपणे पैसा पाठवला आहे.
- मोपलवारांनी ज्या सतीश मांगले नामक इसमाशी हे संभाषण केले आहे, त्याचा जीव धोक्यात आहे. पोलिसांनी तातडीने मोपलवार यांना ताब्यात घेणे गरजेचे आहे.
- या संभाषणात मोपलवार 10-10 कोटींच्या व्यवहारांचा उल्लेख अगदी सहजपणे करीत आहेत. त्यामुळे त्यांनी आजवर शेकडो कोटी रूपयांची उलाढाल केली असावी, हे स्पष्ट आहे.
- याच भ्रष्ट मोपलवारांकडे राज्य सरकारने समृद्धी महामार्गाची संपूर्ण जबाबदारी दिली आहे. या समृद्धी महामार्गातून नेमकी कोणाची समृद्धी होणार, हा प्रश्न आम्ही पहिल्या दिवसापासून विचारतो आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?