Mumbai Crime : मुंबईमध्ये धावत्या रिक्षामध्ये तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर जीवाच्या आकांताने रस्त्यावर उडी मारल्याने एकच खळबळ उडाली होती. बोरिवली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून अवघ्या 6 तासांमद्ये दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. धीरज तिवारी (वय 40 वर्ष) आणि संजीव छतुराम (वय 32 वर्ष) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून हे दोन्ही आरोपी मुंबईत रिक्षा चालवतात. बोरिवली पश्चिमेत शेअर रिक्षात रिक्षा चालक आणि सह प्रवाशाकडून महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे भीतीने धावत्या रिक्षातून महिलेने उडी मारून जीव वाचवला होता. 


धावत्या रिक्षात विनयभंग करण्याचा प्रयत्न


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार बोरिवली पश्चिमेकडील पोईसर येथून रेल्वे स्थानकासाठी शेअर रिक्षा आहेत. या ठिकाणावरून बुधवारी सकाळी पीडित तरुणी शेअर रिक्षामध्ये बसली होती. या रिक्षामध्ये आधीच एक प्रवासी बसला होता. रिक्षा बोरिवली रेल्वे स्थानकाकडे निघाली. रिक्षा सुरू होताच तरुणीशेजारी बसलेल्या व्यक्तीने आणि रिक्षा चालकाने तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला दोघांच्या प्रकाराकडे तरुणीने दुर्लक्ष केले. मात्र, त्यांचे चाळे थांबत नसल्याने तिने रिक्षाचालकाला रिक्षा थांबविण्यास सांगितले. 


रिक्षा थांबवत नसल्याचे पाहून तरुणीने उडी मारली


रिक्षा चालकाने तरुणीच्या विनंतीकडे लक्ष दिले नाही. रिक्षा चालक रिक्षा थांबवत नसल्याचे पाहून तरुणीने धावत्या रिक्षामधून उडी मारली. या घटनेत पीडित तरुणी किरकोळ जखमी झाली. या घटनेची बोरिवली पोलिसांनी तत्परतेने दखल घेत आरोपी रिक्षा चालक आणि छेड काढणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे. बोरिवली पोलिसांनी अटकेतील आरोपींकडून यापूर्वी कोणत्या महिलेसोबत विनयभंग केले आहेत का? या संदर्भात अधिक तपास करत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या