Mumbai News : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अति धोकादायक इमारतींची प्राधान्यक्रम यादी निश्चित करून सुनिश्चित व निर्धारित कार्यपद्धतीनुसार मुंबई पोलिसांच्या सहकार्याने सदर इमारती रिकाम्या करून घ्याव्यात. त्याचबरोबर दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी देखील निर्धारित कार्यपद्धतीनुसार तातडीने कार्यवाही करावी, असं  मुंबई उपनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष अश्विनी भिडे यांनी सांगितलं आहे.


मुंबई महानगरपालिका क्षेत्रात (BMC) असणाऱ्या मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांसाठी दोन स्वतंत्र जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणे आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे या मुंबई उपनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष असून अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशिष कुमार शर्मा हे मुंबई शहर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. या दोन्ही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांच्या अध्यक्ष महोदयांच्या मार्गदर्शनात  पावसाळ्या दरम्यानच्या (Mid Monsoon) एका विशेष बैठकीचे आयोजन काल करण्यात आले होते.
 
अति धोकादायक इमारती त्याचबरोबर दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी निर्धारित कार्यपद्धतीनुसार तातडीने कार्यवाही करावी. या अनुषंगाने मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी अति धोकादायक इमारती रिकाम्या करून घेण्याच्या दृष्टीने मुंबई पोलिसांकडून आवश्यक असणारे सहकार्य महानगर पालिकेला तात्काळ उपलब्ध करून दिले जाईल, असं सांगितलं. 


अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत तक्रार प्राप्त झाल्यास त्या विषयी आवश्यक ती कार्यवाही 24 तासांच्या आत करण्याचे निर्देश महानगरपालिकेच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आणि प्रशासकीय विभागांना दिले.


या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉक्टर संजीव कुमार, मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आर. डी. निवतकर, मुंबई पोलीस दलाचे आयुक्त विवेक फणसाळकर, मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उप आयुक्त (उद्याने) किशोर गांधी, महानगरपालिकेच्या विविध परिमंडळाचे उपायुक्त, उपायुक्त (पायाभूत सुविधा)उल्हास महाले, प्रशासकीय विभागाचे सहाय्यक आयुक्त, संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) महेश नार्वेकर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचे प्रतिनिधी, मुंबई अग्निशमन दलाचे व बृहन्मुंबई सुरक्षा दलाचे संबंधित अधिकारी, आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख संगीता लोखंडे यांच्यासह विविध संस्थांचे अधिकारी – प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने मध्य व पश्चिम रेल्वे, बेस्ट उपक्रम, तटरक्षक दल, म्हाडा, एम.एम.आर.डी.ए., एम.टी.एन.एल., वाहतूक पोलीस, विविध रुग्णालये, विविध स्वयंसेवी संस्था इत्यादींचे प्रतिनिधी उपस्थित होते.