Mumbai Crimes : मुंबई पश्चिम उपनगरातील कांदिवली परिसरात चार जणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या चार मृतांपैकी तीन जण हे एकाच कुटुंबातील असून चौथा मृतदेह चालकाचा आहे. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, चालकाने आपली मालकीण आणि तिच्या दोन मुलींची हत्या केली आणि त्यानंतर आत्महत्या करुन स्वत:चं आयुष्य संपवलं.  


चार मृतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. किरण दळवी, मुस्कान दळवी, भूमी दळवी आणि शिवदयाल सेन अशी मृतांची नावं आहेत. चालक शिवदयाल सेन याने तिघींचा गळा दाबून खून केला.  


पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री कांदिवली पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या कुटुंबातील आई आणि दोन मुलींची त्यांच्याच चालकाने हत्या केली. खून करण्यासाठी चालकाने धारदार शस्त्राचा वापर केला. यानंतर चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. 


चालक आणि मृतांमधील धाकट्या मुलगी यांच्यात प्रेमाचे संबंध होते. यावरुन आई, मुलगी आणि चालकामध्ये वाद झाला. यानंतर चालकाने पहिल्यांदा आईची हत्या केली, मग दोन्ही बहिणींचा खून करुन स्वत:चं देखील आयुष्य संपवलं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


देना बँक जंक्शन इथे घडलेल्या घटनेबद्दल पोलिसांना माहिती मिळाली. हे प्रकरण समोर आल्यानंतर कांदिवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. एका मोबाईल कर्मचाऱ्यासह पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि परिसरात शोध घेतला. रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर रक्ताच्या थारोळ्यात दोन महिलांचे मृतदेह आढळून आल्याने परिसराची झडती घेण्यात आली. पहिल्या मजल्यावरही शोध घेतला असता तेथे दोन व्यक्ती लटकलेल्या अवस्थेत आढळल्या. 


इथे शोध घेतला असता पोलिसांना चालक शिवदयाल सेन याच्या कपड्यांच्या खिशात सुसाईड नोट सापडली आहे. ज्यात त्याने लिहिलं आहे की, "माझं भूमीवर प्रेम आहे. परंतु आमचे संबंध मान्य नसल्यामुळे मी तिघीचा खून करुन स्वत:चं आयुष्य संपवलं." पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात पाठवले आहे. कांदिवली पोलीस पुढील तपास करत आहेत.