Mumbai Crime News: परदेशात चांगली नोकरी करून (Jobs in Abroad) आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचं स्वप्न अनेकजण पाहतात. काहींचे स्वप्न पूर्ण होतात, तर काहीजण धडपड करतात. या धडपडीत काही जणांची फसवणूक होते. विदेशात चांगली नोकरी देण्याचे आमिष दाखवून गोव्यातील एका उच्च शिक्षित तरुणीची फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या तरुणीला मोलकरणीचे काम देण्यात आले होते. अखेर मुंबई पोलीस (Mumbai Police) आणि बहरीनमधील महाराष्ट्र मंडळाच्या मदतीने या तरुणीची सुटका करण्यात आली.
परदेशातील चांगल्या नोकरीसाठी गोव्यातील उच्चशिक्षित तरुणीने प्रयत्न सुरू केले होते. त्यानंतर तिला परदेशात नोकरी मिळाली. मात्र, प्रत्यक्षात तिने कल्पना केली होती ती नोकरी मिळाली नाही. परदेशात मोलकरीण म्हणून काम करण्यास तिला भाग पाडले. तरुणीने घर काम करण्यास विरोध करताच तेथील घर मालकाने तरुणीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात टाकले. आपली फसवणूक झाल्याचे तरुणीने पालकांना कळविले. त्यानंतर त्यांनी याबाबत मुंबई पोलिसांकडे संपर्क साधला. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्राँच युनिट 10, भारतीय दूतावास आणि बहारीन येथील महाराष्ट्र मंडळाच्या (Maharashtra Mandal) प्रयत्नाने या तरुणीची सुटका करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक झालेली तरुणी मूळची गोव्याची आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती परदेशात नोकरीच्या शोधात होती. त्यासाठी तिने काही दलालांची मदत घेतली. दलालांनी तिला बहरीनमध्ये चांगली नोकरी असल्याचे सांगितले. एका दलालासोबत 17 फेब्रुवारीला तरुणी बहरीनला गेली होती. मात्र तिथे गेल्यावर तिला घरकाम करण्यास भाग पाडले. मोलकरीण म्हणून काम करण्यास फिर्यादीने विरोध केल्यावर तिचा पासपोर्ट आणि मोबाईल काढून घेतला गेला आणि तिला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले.
मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्राँच युनिट 10 ने भारतीय दूतावासाच्या मदतीने स्थानिक वकील उपलब्ध करून दिला. त्यामुळे तरुणीची सुटका झाली. मात्र ज्या घरमालकाकडे तरुणी घरकाम करत होते त्याने तिचा पासपोर्ट देण्यास नकार दिला. त्यामुळे पुन्हा बहरीन येथील महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी धावपळ केली. दलाला मार्फत त्या घरमालकाशी संपर्क करून तिचा पासपोर्ट मिळवण्यात क्राईम ब्राँच युनिट दहाला यश आले. त्या तरुणीची सुटका करण्यात क्राइम ब्राँच युनिट 10 चे पोलीस तरुणीला सुखरूप भारतात घेऊन आले. आता तरुणीला तिच्या गोवा येथील घरी सुखरूप आणण्यात आले आहे.
परदेशात नोकरीच्या निमित्ताने अनेकांची फसवणूक होते. यामध्ये रॅकेटही असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. परदेशातील नोकरीची संधी मिळत असली तरी परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या सूचना आणि इतर माहिती घेऊन नोकरीची स्वीकारावी असेही आवाहन अनेकदा करण्यात येते.