Mumbai Crime : मुंबईतील पूर्व उपनगरातून (Mumbai Suburb) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कुर्ल्याच्या (Kurla) नेहरुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कामगार नगरमध्ये एक महिला पोलीस अधिकारी (Female Police Officer) मृतावस्थेत आढळली. कामगार नगरमधील शरद सोसायटीमधील त्यांच्या राहत्या घरी त्यांचा मृतदेह आढळला. प्राथमिक माहितीनुसाह हा नैसर्गिक मृत्यू असल्याची माहिती परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त हेमराज राजपूत यांनी दिली आहे. परंतु या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


दीड वर्षांपासून सीक लीव्हवर


शीतल येडके असं मृत महिला पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. कुर्ल्यातील नेहरुनगर पोलीस स्टेशनमध्ये त्या पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector) म्हणून कार्यरत होत्या. परंतु मागील दीड वर्षांपासून त्या सीक लीव्हवर होत्या. एक वर्षापेक्षा अधिक काळ ड्युटीवर नसल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई देखील करण्यात आली होतं, अशी माहिती मिळत आहे.


फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची शेजाऱ्यांची पोलिसांना माहिती


कामगार नगरमधील शरद सोसायटीलमधील पाचव्या मजल्यावर शीतल येडके यांचा फ्लॅट होता. मागील दोन दिवसांपासून पीएसआयच्या येडके यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली तेव्हा त्यांचा मृत्यू उघडकीस आला. नेहरुनगर पोलिसांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता शीतल येडके या मृतावस्थेत पडलेल्या आढळल्या. त्यांचा मृत्यू तीन ते चार दिवस आधी झाला असावा अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. 


तीन-चार दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती


ज्याअर्थी दुर्गंधी येत होती, त्यानुसार मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टम करण्यासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान मृत्यूचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, परंतु पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. तर प्राथमिक तपासात महिला पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू नैसर्गिक असल्याची माहिती झोन सहाचे पोलीस उपायुक्त हेमराज राजपूत यांनी दिली. नेहरुनगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


भायखळा जेलबाहेर डोक्यात गोळी झाडून पोलिसाने जीवन संपवलं


दोन महिन्यांपूर्वी मुंबईच्या भायखळा कारागृहाबाहेर तैनात असलेल्या एका पोलिसाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. ही घटना 23 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली होती. श्याम वरगडे असं या पोलीस हवालदाराचे नाव होतं. ते ताडदेव लोकल आर्म युनिट 2 मध्ये कार्यरत होते. श्याम वरगडे यांची नियुक्ती भायखळा जेलच्या गेटवर करण्यात आली होती.