Mumbai Crime News : कल्याण ते टिटवाळा (Kalyan To Titwala) रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकल (Mumbai Local Train) गाडीतील लगेच बोगीत मारहाण करत एका वयोवृद्ध इसमाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी (2 मार्च) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. हत्या करण्यात आलेल्या वयोवृद्धाचे नाव बबन हांडे देशमुख आहे. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
लगेज बोगीत चढण्यावरुन किंवा बसण्यावरुन वाद
लोकलमध्ये चढण्याच्या किंवा बसण्याच्या वादातून ही घटना घडली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त करत तपास सुरु केला आहे. दरम्यान या घटनेमुळे धावत्या लोकल गाडीतील प्रवाशांच्या जीवाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बबन हांडे देशमुख हे सेवानिवृत्त होते. ते आंबिवली येथे राहत होते. दुपारच्या सुमारास हांडे काही कामानिमित्त कल्याणला आले होते. त्यांचे काम आटोपून ते पुन्हा आंबिवलीला घरी जाण्यासाठी निघाले. त्यांनी कल्याण रेल्वे स्थानकातून दुपारच्या सुमारास टिटवाळ्याच्या दिशेने जाणारी गाडी पकडली. ते गाडीच्या लगेज बोगीत चढले होते. त्याठिकाणी गाडीत चढण्यावरुन किंवा बसण्यावरुन वाद झाला. या वादातून काही जणांनी त्यांना जबर मारहाण केली. या मारहाणीत बबन हांडे देशमुख यांचा मृत्यू झाला.
हत्येप्रकरणी एक संशयित अटकेत
ही घटना कल्याण ते टिटवाळा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान घडली. तोपर्यंत गाडी टिटवाळा रेल्वे स्थानकात पोहोचली होती. गाडीच्या लगेज बोगीत बबन हांडे देशमुख हे मृतावस्थेत पाहावयास मिळाले. त्यांच्या डोक्यातून रक्त वाहत होते. हे पाहून अन्य प्रवाशांनी याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच कल्याण रेल्वे पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला. बबन हांडे देशमुख यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. बबन हांडे देशमुख यांच्या हत्येप्रकरणी एका संशयिताला कल्याण रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक मुकेश ढगे यांनी दिली आहे.
मुंबई लोकलमध्ये (Mumbai Local) मारहाणीच्या घटना सातत्यानं घडत असल्याचं समोर येतं. रोज कुठेना कुठेना अगदी क्षुल्लक कारणांवरुन बाचाबाची, मारहाण असे प्रकार घडत असतात. सीटवर बसण्यावरुन तर नेहमीच मारहाणीच्या घटना घडत असतात. त्यामुळे प्रवाशांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :