Amey Khopkar On Sandeep Deshpande Attack : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर आज मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकदरम्यान हल्ला झाला. या हल्ल्याप्रकरणी मनसेचे नेते अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी मोठा आरोप केला आहे. अमेय खोपकर यांनी संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना ताब्यात घेऊन चौकशी करावी आणि जर काही तथ्य निघालं तर त्यांना अटक करावी, अशी मागणी अमेय खोपकर यांनी केली आहे.


संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्कमध्ये हल्ला


मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) आज संदीप देशपांडे यांच्यावर  अज्ञातांनी हल्ला केला. मॉर्निंग वॉकच्या वेळी ही घटना घडली. या हल्ल्यात संदीप देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली. त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार करण्यात आले. देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला फ्रॅक्चर झालं आहे. राजकीय वैमन्यस्यातून अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला (Attack On Sandeep Deshpande) केल्याचा संशय आहे. 


भ्याड हल्ल्याचं उत्तर नक्की मिळेल : अमेय खोपकर


या हल्ल्याविषयी प्रतिक्रिया देताना अमेय खोपकर म्हणाले की, "माझी मुंबई पोलिसांना नम्र विनंती आहे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना ताबडतोब ताब्यात घ्यावं आणि चौकशी करावी. हे कसलं @#$% सारखे पाठीमागून हल्ला करतात. कारण संदीप देशपांडे सातत्याने मुंबई महापालिकेचे भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत. माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नम्र विनंती आहे की आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची चौकशी करावी आणि जर काही तथ्य निघालं तर त्यांना अटक करावी. संदीप देशपांडे गप्प बसणारा माणूस नाही. मुंबई पोलीस आणि प्रशासनाने संदीप देशपांडे यांना योग्य ती सुरक्षा पुरवावी. आजच्या भ्याड हल्ल्याचं उत्तर नक्की मिळेल. पाठीमागून हल्ले करायचे नाहीत. मर्द असाल तर पुढे या. संदीप देशपांडे सतत मुंबई महापालिकेचे भ्रष्टाचार बाहेर काढत असेल आणि त्यांच्यावर हल्ले होत असतील तर आम्ही गप्प बसायचं का?"


कसा झाला हल्ला?


मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर वॉक करत असताना चार अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला. क्रिकेट खेळताना जे स्टम्प्स वापरतात त्याद्वारे देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या चारही इसमांनी आपला चेहरा कपड्याने झाकला होता. संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉकला जातात याची आरोपींना कल्पना होती. हल्ला केल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. संदीप देशपांडे सध्या सुखरुप आहेत. त्यांना थोडा मार लागला आहे. त्यांनी उपचारासाठी हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शिवाजी पार्क पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा करण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. 


संबंधित बातमी