Mumbai Crime : मुंबईच्या जुहू गल्ली परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जुहू गल्ली परिसरात राहणाऱ्या एका दाम्पत्याने (Couple)आपल्या अवघ्या दोन दिवसांच्या नवजात बाळाचे (New Born Baby) रिक्षातून अपहरण झाल्याची तक्रार जुहू पोलीस ठाण्यात दिली. मात्र जुहू पोलिसांनी अवघ्या काही तासातच तपास करुन जे सत्य समोर आणले आहे ते ऐकूनच पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. शिवाय या निर्दयी पालकांविषयी संतापाची लाट नक्कीच उसळेल. आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने दाम्पत्याने हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे.
बाळाचे रिक्षातून अपहरण झाल्याची तक्रार
मिळालेल्या माहितीनुसार, 1 ऑगस्टच्या मध्यरात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास जुह गल्ली परिसरात राहणाऱ्या इमरान सैनूर खान (वय 28 वर्षे ) त्याची पत्नी रहनुमा इमरान खान (वय 25 वर्षे) या दाम्पत्याने आपल्या दोन दिवसांच्या बालकाचे रिक्षातून अपहरण झाल्याची तक्रार जुहू पोलीस ठाण्यात दिली. आपल्या तक्रारीत त्याने म्हटलं की, वॉशरुमला जाण्याच्या कारणाने मी रिक्षाचालकाला रिक्षा थांबवण्यास सांगितलं. परत येईपर्यंत बाळाकडे लक्ष दे असं सांगून मी उतरलो. परंतु परत आल्यानंतर पाहिलं असता, रिक्षात बाळ नसल्याचं दिसलं.
जुहू पोलिसांनी तपासास सुरुवात करुन त्यांच्या शेजाऱ्यांकडे देखील चौकशी केली. यात शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रहनुमा खान हिची 29 जुलै रोजी राहत्या घरी प्रसुती झाली. तिने मुलाला जन्म दिला. परंतु दोन दिवसानंतर नवजात बालक दिसून आले नाही म्हणून शेजाऱ्यांनी त्यांच्याकडे चौकशी देखील केली.
पोलिसी खाक्या दाखवताच दाम्पत्याने सत्य सांगितलं
बालकाचं अपहरण झाल्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि गणेश जैन, पो.उ. नि.सीमा फरांदे, पो. ह.पाटील, पो. ह. खोमणे, पो. शि. कणमुसे, पो.शी.पन्हाळे या तपास पथकाने संबंधित दाम्पत्याची कसून चौकशी केली. चौकशीतून जे सत्य समोर आलं ते मात्र भयानक होतं. तपास पथकाने पोलिसी खात्यात दाखवताच दाम्पत्याने खरं काय घडलं ते सांगितलं. जन्मदात्यांनीच आपल्या नवजात बालकाला सांताक्रूज पश्चिम इथल्या खिरा नगर इथे पार्क केलेल्या रिक्षामध्ये सोडून दिल्याचं कबूल केलं.
यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकाने सांताक्रूज पोलिसांना संपर्क साधला असता 30 जुलै रोजी ऑटोरिक्षामध्ये नवजात बालक सापडलं असल्याचं समजलं. यासंदर्भात सांताक्रूज पोलीस ठाण्यात दाम्पत्याविरोधात कलम 317 भादवि अन्वये गुन्हा नोंद केला आहे. यानंतर जुहू पोलिसांनी इमरान खान आणि रहनुमा खान यांना सांताक्रूज पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. तर बाळाची प्रकृती व्यवस्थित असून त्याला देखरेखीसाठी भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हेही वाचा