Jaipur Express Firing : मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमधील गोळीबार (Firing) प्रकरणातील चारही मृतांचा शवविच्छेदन अहवाल (Post Mortem Report) समोर आला आहे. शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना गोळ्या लागल्याने चौघांचा मृत्यू झाला. मृतांच्या मुख्यत्वे करुन डोक्याला आणि छातीत गोळ्या लागल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलं आहे. मुंबईतील सर जे जे रुग्णालयात (J J Hospital) या चारही जणांचं शवविच्छेदन करण्यात आलं होतं. चारही मृतांना एकूण 11 गोळ्या लागल्याचं अहवालात म्हटलं आहे.


धावत्या ट्रेनमध्ये गोळीबाराचा थरार


दरम्यान, मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये 31 जुलैच्या पहाटे हत्याकांड घडलं. धावत्या ट्रेनमध्ये झालेल्या या गोळीबारात आरपीएफच्या एएसआयसह चार जणांचा मृत्यू झाला. मारेकरी हा आरपीएफ (RPF) शिपाईच होता, जो प्रवाशांच्या सुरक्षेसाठी त्याच ट्रेनमध्ये तैनात होता. आरोपी शिपाई चेतन सिंह याला जीआरपीने अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात पाठवण्यात आले होते. 


चारही मृतांना 11 गोळ्या लागल्या


शवविच्छेदन अहवालानुसार, या घटनेतील चार मृतांना 11 गोळ्या लागल्या आहेत. आरपीएफचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टिकाराम मीणा यांना चार गोळ्या लागल्या होत्या. तर असगर अब्बास शेख यांना तीन गोळ्या तसंच मोहम्मद हुसेन बुरहानपूरवालाआणि सय्यद सैफुल्लाह मोईनुद्दीन असगर अब्बास शेख यांना प्रत्येकी दोन गोळ्या लागल्या होत्या. अवयवांना गोळ्या लागल्याने अतिरक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला.


एकामागोमाग चार जणांचा जीव घेतला


आरपीएफ शिपाई चेतन सिंहने त्याचे वरिष्ठ असलेल्या एएसआय टिकाराम मीणा यांच्यासह तीन प्रवाशांना गोळ्या घालून जीव घेतला. बी-5 कोचमध्ये टिकाराम मीणा, बी-4 कोचमधील मोहम्मद हुसेन बुरहानपूरवाला, पँट्री कारमध्ये असलेल्या सय्यद सैफुल्लाह मोईनुद्दीन असगर अब्बास शेख यांचीएकामागोमाग हत्या केली. त्यानंतर सकाळी सहाच्या सुमारास मीरा रोड स्थानकाजवळ प्रवाशांनी साखळी ओढून ट्रेन थांबवली. यावेळी आरोपीने खाली उतरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र जीआरपीने त्याला पकडलं.


त्या रात्री कोण कोण होते ड्युटीवर?


मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये त्या रात्री ASI टिकाराम मीणा (वय 58 वर्षे), पोलीस हवालदार नरेंद्र परमार (वय 58 वर्षे), शिपाई अमेय आचार्य (वय 26 वर्षे) आणि शिपाई चेतन सिंह (वय 33 वर्षे) ड्युटीवर होते. 


या सर्वांची 28 जुलैपासून एक आठवड्याभर मेल पॅसेन्जर गाड्यांवर एस्कॉर्टिंग करण्याची ड्युटी नेमलेली होती. 


रविवारी रात्री नऊच्या दरम्यान सौराष्ट्र मेल या ट्रेनमधून हे सर्व अधिकारी आणि कर्मचारी एक्सॉर्ट करत सूरतपर्यंत गेले आणि सूरतवरुन जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसने एक्सॉर्ट करत मुंबईला येत होते तेव्हा हा प्रकार घडला. 


हेही वाचा


Jaipur Express Firing : मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस गोळीबार प्रकरण; चौथ्या मृताची ओळख पटली, अजमेर शरीफहून परतताना झाला गोळीबार