मुंबई: भिवंडी (Bhiwandi) शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली आहे. पूर्ववैमनस्यातून या तरुणाची हत्या झाली असल्याची माहिती समोर येत आहे. तर, या युवकाची हत्या करून मृतदेह काल्हेर येथील खाडीकिनारी निर्जनस्थळी गाडण्यात आले होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चौकशी करत दोघांना ताब्यात घेतले असून, जुन्या वादातून त्यांनी ही हत्या केली असल्याचे समोर येत आहे. योगेश रवि शर्मा (वय 16 वर्ष) असे मयत अल्पवयीन तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश शर्मा हा काल्हेर येथील आशापुरा कॉम्प्लेक्स भागात राहत होता. दरम्यान, 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी त्याच्या काही मित्रांनी त्याला काल्हेरच्या रेतीबंदर येथे दारू पिण्यासाठी येत असल्याचे सांगितले. त्यामुळे चकन्यासाठी काहीतरी घेऊन ये असे देखील त्याला सांगितले. त्यानंतर योगेश घरातून गेला तो परत आलाच नाही. त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी अनेक ठिकाणी शोध घेऊन देखील तो मिळून आला नाही. शेवटी नारपोली पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. योगेश अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
हत्या केल्यावर मृतदेह पुरून ठेवला...
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नारपोली पोलिसांनी योगेश यापूर्वी राहत असलेल्या कामतघर ब्रह्मानंदनगर येथील जुन्या मित्रांचा शोध घेतला. याचवेळी, काही युवकांसोबत सहा महिन्यापूर्वी योगेशचा वाद झाल्याचे पोलीस तपासात समोर आले. दरम्यान, याचवेळी पूर्ववैमनस्यातून आपल्या मुलाचे अपहरण झाले असल्याचा संशय योगेशच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला होता. त्यानंतर पोलिसांनी ब्रह्मानंदनगरच्या कामतघर परिसरातून आयुश विरेंद्र झा (वय19 वर्ष), मनोज नारायण टोपे (वय 19 वर्ष) या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. ज्यात, या दोघांनी योगेशची धारदार हत्याराने वार करून आणि डोक्यात दगड मारून निर्घृण हत्या केल्याचं स्पष्ट झाले. तसेच मृतदेह काल्हेर रेतीबंदर येथील निर्जन गवताच्या ठिकाणी पुरून ठेवल्याचे देखील सांगितले. नारपोली पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून, मृतदेह बाहेर काढत उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. तसेच, या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्यात आणखी चार जणांचा समावेश
याप्रकरणी नारपोली पोलिसांनी आयुश विरेंद्र झा व मनोज नारायण टोपे यांना अटक केली आहे. तर, या हत्येच्या गुन्ह्यात आणखी चार जणांचा समावेश आहे. सहा महिन्यापूर्वी ब्रह्मानंदनगर येथे योगेशसोबत वरील सर्वांचे भांडण झाले होते. त्या रागातूनच योगेशची हत्या झाली असल्याचा आरोप मयत योगेशच्या आईने केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Dhule Crime News : सतत रडतो म्हणून मामाने भाच्यासोबत केलं भयंकर कृत्य; थेट कायमचं संपवलं