मुंबई : बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) पर्दाफाश करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे या टोळीमध्ये एका डाॅक्टरचा देखील समावेश आहे. फर्टिलिटी केंद्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या मदतीने रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. या टोळीने आत्तापर्यंत 14 बालकांची विक्री केल्याचं तपासात उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मुंबई पोलिसांनी एका डाॅक्टरसह 7 जणांना बेड्या ठोकल्या
पोलिसांनी बालकांची विक्री करणाऱ्या महिला दलालासह एकूण 7 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच तीन जणांना सखोल चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वंदना अमित पवार, शितल गणेश वारे, स्नेहा सूर्यवंशी, नसीमा खान, लता सुरवाडे, शरद देवर आणि डॉ. संजय सोपानराव खंदारे यांचा समावेश आहे.
सर्व आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींनी या गँगच्या माध्यमातून विक्री केलेल्या लहान बाळांमध्ये 11 मुले आहेत, तर तीन मुली आहेत. कमीत कमी पाच दिवस ते जास्तीत जास्त 9 महिने असं विक्री केलेल्या बाळांचे वय आहे. पोलिस उपायुक्त रागासुधा आर. यांनी दिलेल्या माहितीनुसार एका बीएचएमएस डॉक्टरला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. फर्टिलिटी फर्टिलिटी केंद्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या मदतीने रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. लहान बाळांची विक्री करणाऱ्या टोळीतील 7 लोकांना अटक करण्यात आली आहे.
आतापर्यंत 14 लहान बाळांची विक्री झाल्याचं समोर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 14 लहान बाळांची विक्री झाल्याचं समोर आलं असून 2 बाळांची सुखरुप सुटका करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. अटकेतील आरोपी मुंबईमधील काही हॉस्पिटलमध्ये काम करत आहेत. बालक विक्री प्रकरणात काही हॉस्पिटलही मुंबई पोलिसांच्या रडारवर आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये डॉ. संजय सोपानराव खंदारेचं दिव्यामध्ये दवाखाना आहे. मुळचा नांदेडचा रहिवासी असणारा हा डॉक्टर या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे समोर आलं आहे. पोलिस उपायुक्त रागासुधा आर. म्हणाले की, कदाचित या डॉक्टरकडे लहान मुलांचे हे पालक गेले असावेत. तिथं त्यांचा संपर्क झाला असावा असा आमचा संशय आहे. विक्रोळीमधून एका बाळाची विक्री करुन रत्नागिरीमध्ये देण्यात आलं होतं. तेलंगणामधून या बाळांची डिमांड होती आणि त्यानुसार या बाळांची विक्री केली जात होती. तेलंगणा आणि हैदराबादमधून खास करुन या बाळांच्या खरेदीचा प्रस्ताव होता, असेही त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या