मुंबई : कोरोनाचा खोटा अहवाल तयार करूण देणाऱ्या एकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 4 च्या पथकाने ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विक्रम तेली असून तो मोबाईल शॉपी चालवतो. जास्त पैसे कमावण्यासाठी तो अशी फसवणूक करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. 


मुंबईत प्रवास करण्यासाठी कोरोनाच्या दोन्ही लसी घेतलेल्या प्रमाणपत्राची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे विक्रम तेली हा लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र तयार करून देत होता. त्याबरोबरच ऑफिसमधून सुट्टी घेण्यासाठी अनेकांना तो कोरोनाचा पॉझिटिव्ह अहवालाचे प्रमाणपत्र देत होता, अशी माहिती पोलिसांच्या तपासातून पुढे आली आहे.  
 
क्राइम ब्रांचचे डीसीपी नीलोत्पल यांनी एबीपी न्यूजसोबत बोलताना सांगितले की, "एक व्यक्ती लोकांना खोटे कोरोना अहवाल देत असल्याची आम्हाला माहिती मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर आम्ही बनावट ग्राहक पाठवून कोरोनाचा बनावट अहवाल मागितला. विक्रम तेली याने अहवालाची प्रत देताच आम्ही त्याला रंगेहाथ पकडून अटक केली."


गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी 4 बनावट ग्राहक पाठवले होते. त्यातील दोन जणांनी पॉझिटिव्ह रिपोर्ट मागितला आणि दोन जणांचा निगेटिव्ह रिपोर्ट मागितला. तेली यांने दोन्ही रिपोर्ट बनवून गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना दिले. चौकशीदरम्यान, त्याने सांगितले की त्याने नायट्रो प्रो पीडीएफ एडिटर वापरून असा खोटा अहवाल तयार केला होता.
  
या प्रकरणाच्या तपासासाठी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक इंद्रजित मोरे, जगदीश भांबळ, एपीआय गव्हाणे, बिरादार यांच्यासह आणखी 7 जणांचे पथक तयार करण्यात आले होते.  


महत्वाच्या बातम्या