मुंबई : कतारमध्ये हनिमूनसाठी गेलेले आणि एका ड्रग प्रकरणात बळीचा बकरा बनलेले मुंबईतील दाम्पत्य ओनिबा कुरेशी आणि शरीक कुरेशी दोन वर्षानंतर मायदेशी परतले आहे. आज मध्यरात्री ते मुंबईत परतले. या दाम्पत्याला कतारमध्ये एका ड्रग प्रकरणात दहा वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण नार्कोटिस्क कन्ट्रोल ब्युरोने केलेल्या प्रयत्नाने त्यांची आता सुटका झाली आहे. ते तुरुंगातच जन्मलेल्या आपल्या मुलीसह भारतात परतले आहेत. 


कतारमध्ये हनिमूनसाठी जाण्याचा अनुभव इतका भयानक असेल असं ओनिबा आणि मोहम्मद शरीक कुरेशी यांना स्वप्नातदेखील वाटलं नसेल. अखेर दोन वर्षानंतर हे दांपत्य मुंबईत परतलं. या दाम्पत्याला कतारमध्ये एका ड्रग प्रकरणात दहा वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण नार्कोटिस्क कन्ट्रोल ब्युरोच्या प्रयत्नानं या आरोपांतून त्यांची कतारच्या जेलमधून सुटका झाली आहे. 3 फेब्रुवारीला या दाम्पत्याची निर्दोष सुटका झाली आहे. कतारमध्ये ड्रग्स प्रकरणात निर्दोष सुटका होणे ही जवळपास अशक्यप्राय गोष्ट समजली जाते. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने या प्रकरणाची सर्व तपासणी करून संबंधित सर्व पुरावे कतारच्या सर्वोच्च न्यायालयापुढे ठेवले. त्यानंतर यावर निर्णय सुनावताना कतारच्या न्यायालयाने हे दाम्पत्य निर्दोष असल्याचं सांगितलं आणि त्यांची तुरुंगातू सुटका करण्याचे आदेश दिले.


पाहा व्हिडीओ : Drug case | स्पेशल रिपोर्ट | हनिमूनसाठी कतारमध्ये गेले अन् ड्रग्ज प्रकरणात अडकले



ओनिबा आणि मोहम्मद कुरेशी हे दाम्पत्य 2019 मध्ये कतारमध्ये हनिमूनसाठी गेलं होतं. त्यांचेच नातेवाईक असलेल्या तबस्सुम रियाज कुरेशी यांनी त्यांना हे फ्री हनिमून पॅकेज दिलं होतं. परंतु त्यांच्या साहित्यामध्ये त्यानं चार किलो हाशिश लपवून ठेवलं होतं. कतारमध्ये गेल्यानंतर या इमिग्रेशनमध्ये त्यांच्या सामानात हे ड्रग्ज सापडल्यानं त्यांना तिथं अटक झाली आणि त्यांना दहा वर्षांची शिक्षा आणि एक कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला.


या दाम्पत्याला त्यांच्या नातेवाईकाकडून सांगण्यात आलं होतं की, ते पाकिट तंबाखूचं आहे आणि कतारमधील त्यांच्या एका मित्राला केवळ हे नेऊन द्यायचं आहे. ही गोष्ट त्यांनी कतार पोलिसांना वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. दरम्यान, ओनिबा या गर्भवती राहिल्या होत्या आणि त्यांनी तुरुंगातच आपल्या मुलीला जन्म दिला. या दाम्पत्यानं आणि त्यांच्या घरच्यांनी अनेक ठिकाणी मदतीसाठी याचना केली. अखेरीस पंतप्रधान कार्यालयातून हे प्रकरण नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडे देण्यात आलं. एनसीबीनं या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि या दांपत्याचे नातेवाईक असलेल्या तबस्सुम रियाज कुरेशी यांच्या मुसक्या आवळत पुरावे गोळा केले. सर्व पुरावे समोर येताच एनसीबीनं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क केला आणि कतारच्या राजदूतांशी चर्चा केली. त्यानंतर या दाम्पत्याला कतारच्या सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यास सांगण्यात आलं आणि अखेरीस त्यांच्या सुटकेवर शिक्कामोर्तब करण्यात आलं.


महत्वाच्या इतर बातम्या :