वसई : नालासोपारा पूर्वेकडील विनायक हॉस्पिटलमधील 7 रुग्णांच्या मृत्यूनंतर वसई विरार महापालिका प्रशासनाने ऑक्सिजन मुबलक प्रमाणात असल्याचा दावा केला आहे. या घटनेला 24 तासाचा कालावधी ही उलटला नाही तर वसईतील सिटी केअर हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन पुरवठा होत नसून ऑक्सिजन चढ्या बाजाराने विक्री होत असल्याचाही आरोप डॉक्टरांनी केला आहे.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या एजन्सी मनमानी करत असल्याचा आरोप केला आहे. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण करून, तेच ऑक्सिजन चढ्याभावाने रुग्णालयांना विकलं जात असल्याचा आरोप सिटी केअर रुग्णालयाचे डॉक्टर नाझीर शेख यांनी केला आहे.
400 ते 500 रुपयांचे ऑक्सिजन सिलेंडर 800 ते 1200 रुपयाला विकलं जात आहे. तेही वेळेत न देता चालढकलपणा केलं जात असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे अति गंभीर रुग्णाना वाचवायचे कसे असा प्रश्न आता डॉक्टरांसमोर उभा आहे.
वसईच्या सिटी केअर रुग्णालयात कोव्हिडंचे 12 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी 6 रुग्ण हे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर आहेत. रुग्णालयात सहाच ऑक्सिजन सिलेंडर शिल्लक आहेत. चढ्या भावाने ऑक्सिजन सिलेंडर घेऊन सुद्धा वेळेत मिळत नाहीत, सर्व हॉस्पिटल कोव्हिड रुग्णांनी फुल झाली आहेत. बेड मिळत नाहीत. आम्ही काय करावे असा प्रश्न ही डॉक्टरांनी विचारला आहे.