Mumbai Coronavirus Update : सध्या कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं जगाची धाकधुक वाढवली आहे. देशासह राज्यातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. अशातच देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. मुंबई पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अवघ्या 13 दिवसांतच मुंबईतील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. काल (रविवारी) दिवसभरात कोरोनाच्या तब्बल 922 रुग्णांची नोंद मुंबईत झाली आहे. 


कोरोनाच्या प्रादुर्भावापासूनच मुंबईत कोरोनानं धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं होतं. अशातच देशासह राज्यात आलेली पहिली आणि दुसरी लाट तर मुंबईकरांसाठी भयावह ठरली होती. औषधं, ऑक्सिजन आणि बेड्सचा तुटवडा यांमुळे अनेक रुग्णांची ससेहोलपट झाल्याचं पाहायला मिळालं. दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आलं असतानाच ओमायक्रॉनसह पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. काल दिवसभरात (रविवारी) 24 तासांत मुंबईत कोरोनाच्या तब्बल 922 नवीन रुग्णांची नोंद झाल्यानं कोरोनानं पुन्हा टेंशन वाढवलं आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7,71,112 वर पोहोचली आहे. तर रविवारी कोरोनामुळे दोन मृत्यू झाल्यानं मृतांची संख्या 16,370 वर पोहोचली आहे. 


दरम्यान, मुंबईत कोरोनाचा पुन्हा फैलाव होत असून केवळ 13 दिवसांत पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत झपाट्यानं वाढ होत असल्यानं ही मुंबईकरांसाठी चिंतेची बाब आहे. डिसेंबर महिन्यात फक्त 1 डिसेंबर रोजी कोरोनाबाधित रुग्ण संख्या कमी म्हणजे 108 आढळली होती.


13 दिवसांत पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत झपाट्यानं वाढ :


14 डिसेंबर - 225
15 डिसेंबर - 238
16 डिसेंबर - 279
17 डिसेंबर - 295
18 डिसेंबर - 283
19 डिसेंबर - 336
20 डिसेंबर - 204
21 डिसेंबर - 337
22 डिसेंबर - 490
23 डिसेंबर - 602
24 डिसेंबर - 683
25 डिसेंबर - 757
26 डिसेंबर - 922


मुंबईत ओमायक्रॉनच्या 27 रुग्णांची नोंद, महाराष्ट्रातील एकूण संख्या 141 वर 


महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरियंटमुळं (Omicron Cases In Maharashtra) काल (रविवारी) 31 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 27 रुग्ण मुंबईतील आहेत. तर ठाण्यात दोन, ग्रामीण पुण्यात एक आणि अकोलामध्ये एका रुग्णांची नोंद झाली आहे. त्यानंतर मुंबईत ओमायक्रॉन व्हेरियंटमुळं बाधित होणाऱ्यांचा एकूण आकडा 74 वर पोहोचला आहे. तसेच, राज्यातील एकूण बाधितांचा आकडा 141 वर पोहोचला आहे. 


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह