Mumbai Coronavirus Update : सध्या संपूर्ण जगाची धाकधुक कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं वाढवली आहे. देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असणाऱ्या राज्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अशातच त्यातल्या त्यात देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत तर कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातल्या त्यात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेली धारावीचीही चिंता वाढली आहे. सध्याचा धारावीतील दैनंदिन रुग्णांचा आकडा पाहता, मुंबईतील धारावी टेन्शन वाढवणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


मुंबईत एका दिवसात रुग्णांचा आकडा 20 हजार पार गेला आहे. मुंबईत काल (गुरुवारी) 20 हजार 181 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर यापैकी 1 हजार 170 रुग्णांना फक्त रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. मुंबईत दिवसभरात कोरोनामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच धारावीत काल दिवसभरात तब्बल 107 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील आकडेवारीपेक्षा सध्याची अधिक आकडेवारी चिंतेत भर घालणारी आहे. प्रामुख्याने दाटीवाटीचा परिसर, सार्वजनिक शौचालय व्यवस्था आणि लसीकरणासंबंधी नागरिकांची अनास्था हे चित्र असल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. 


मुंबईत गृहविलगीकरणासाठी नवी नियमावली


कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या अनेक रुग्णांमध्ये सौम्य किंवा कुठलेच लक्षण दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर अशा कोरोना रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवताना नेमक्या कोणत्या नियमांचे काटेकोरपणे पालन करायचे आहेत ?  याबाबत मार्गदर्शक सूचना मुंबई महापालिकेने जारी केल्या आहेत. जे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण कुठलेही  लक्षण नसलेले असतील आणि त्यांना कुठल्याही प्रकारच्या श्वसनाचा त्रास नसेल, शिवाय ताप नसेल, ऑक्सिजन पातळी  देखील नॉर्मल असेल अशा व्यक्तींना गृह विलगिकरणात ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. 


दरम्यान, मुंबईतील झपाट्यानं वाढणारी रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत आहे. अशातच मुंबईचा दैनंदिन रुग्णांचा आकडा 20 हजारांच्या पार पोहोचला तर मुंबई कडक निर्बंध लावण्याचा विचार केला जाईल, असं महापालिका आयुक्त आणि महापौरांनी सांगितलं होतं. अशातच काल (गुरुवारी) मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा 20 हजारांवर पोहोचला आहे. त्यामुळे मुंबईत लॉकडाऊन होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह