मुंबई : राज्यात कोरोना संसर्गाचा आलेख अजूनही चढताच आहे. अनेक जिल्ह्यात परिस्थितीत चिंताजनक आहे. अशात सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या मुंबईत मात्र परिस्थिती खूप सकारात्मक आहे. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असून मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही कोरोनाची लागण झालेल्यांपेक्षा जास्त आहे. मागील 24 तासांत मुंबई एकूण 3,039 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4,052 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रिकव्हरी रेट 90 टक्के झाला आहे.
शहरात 35224 कोरोना चाचणी करण्यात आल्या होत्या. दरम्यान, आज 71 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या मुंबईत 49 हजार 499 सक्रीय रुग्ण आहेत.
सुप्रीम कोर्टाकडून मुंबई महापालिकेचं कौतुक
मुंबई महापालिकेकडून आपण काही शिकू शकता का? असा सवाल न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला आहे. दिल्लीला होत असलेल्या ऑक्सिजन तुटवड्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेचे कौतुक करत केंद्र सरकारला सल्ला दिला. तसेच, मुंबई महापालिकेकडून आपण काही शिकू शकता का? असा सवालही न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला.
सर्वोच्च न्यायालय म्हणाले, मागच्या वेळी मुंबई महापालिकेने ऑक्सिजन पुरवठा आणि वितरणाबाबत चांगले काम केले होते. आपण त्यांच्याकडून काही शिकू शकतो का? दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिल्ली राज्याला ऑक्सिजन पुरवठा आवश्यक प्रमाणात न केल्याबाबत कारणे दाखवा नोटीस जारी केलं होतं. याच नोटिशीला केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. केंद्र सरकारच्या याचिकेवर सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर त्याचे पालन व्हायला हवे. अधिकाऱ्यांना तुरुंगात पाठवून दिल्ली राज्याला ऑक्सिजन मिळणार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला सुनावले.
सर्वोच्च न्यायालयानं मुंबईचं कौतुक का केलं?
- एमएमआरडीएच्या सहकार्यानं फिल्ड हॉस्पिटल्स, जम्बो कोविड सेंटर उभी केली त्यामुळे इतर रुग्णालयांवरचा भार कमी झाला...
- गेल्या लॉकडाऊनचा अनुभव लक्षात घेऊन या लॉकडाऊनमध्ये मायक्रो प्लानिंग केले
- अत्यावश्यक गोष्टी--विशेषत:ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर चा तुटवडा होणार नाही याकडे मुंबई महापालिकेनं लक्ष दिले
- टेस्ट वाढवण्यावर भर देण्यात आला...गर्दीच्या ठिकाणी-जसे, मार्केट, मॉल, रेल्वे स्टेशन येथे टेस्टिंग कॅम्प सुरु केले
- पॉझिटीव्हिटी रेट कमी करण्यावर भर,संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन केल्यावर पॉझिटीव्हीटी रेट घसरला
- डेथ रेट गेल्या पहिल्या लाटेच्या तुलनेत कमी झाला
- बेड मॅनेजमेंट मॉडेल तयार केले...वॉर्डस्तरावर बेड वाटप केले...यासाठी वॉर्ड वॉर रुम कार्यरत करण्यात आले...
- बेड उगाच अडवले जाऊ नयेत यासाठी रुग्णाच्या आजाराच्या तीव्रतेप्रमाणे बेडस् चं योग्य नियोजन करण्यात आलं...
- खाजगी रुग्णालयातील बेडस् बेडस् चं वाटपही वॉर्ड रुमच्या मार्फत केलं गेलं
- लसीकरणासाठी यंत्रणेची उभारणी केली...खाजगी हॉस्पिटल्समध्ये देखिल सुविधांचा, क्षमतांचा आढावा घेऊन लसीकरणाची परवानगी दिली.