मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (5 मे 2021) मराठा आरक्षण रद्द केल्याचा निर्णय दिला आणि राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागलं आहे. महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. अशातचं अभिनेता रितेश देशमुख याने आपले वडील दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा आरक्षणासंदर्भातील जुना व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये विलासराव देशमुख यांनी आरक्षणावर आपले विचार मांडले आहेत.
काय आहे व्हिडीओमध्ये?
गेल्या काही वर्षांपासून आरक्षण प्रश्नाने डोकं वर काढलं आहे. पण ‘एबीपी माझा’च्या कार्यक्रमात काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी दहा वर्षांपूर्वी एक भाषण केलं होतं, ते भाषण आजही विचारप्रवर्तक आणि दिशादर्शक आहे. ‘माझा महाराष्ट्र ट्वेण्टी ट्वेण्टी’ या कार्यक्रमात विविध पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्राबाबतचं व्हिजन मांडलं होतं. त्यावेळी मंचावर भाजप नेते गोपीनाथ मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर आर पाटील, शिवसेना नेते मनोहर जोशी आणि ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर उपस्थित होते.
याच कार्यक्रमातील विलासराव देशमुखांच्या भाषणाची क्लीप विलासराव देशमुखांचा सुपुत्र आणि अभिनेता रितेश देशमुखने स्वत: सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यावेळी विलासराव देशमुख म्हणाले होते, “आज मुंडेसाहेब तुम्ही आरक्षणाबाबतची चर्चा केली. कोणाला आरक्षण द्यावं, देऊ नये याबद्दल आपला विरोध नाही. पण जेव्हा एक जातीनिहाय आरक्षण देण्याचा प्रश्न येतो, तेव्हा हा संघर्ष भविष्यातही राहणार. म्हणून आर्थिक निकषावर आधारित जर आपण सर्वांना सवलती देण्याचा विचार केला, तर लोक आपली स्वत:ची जात शोधण्याचा प्रयत्न करणार नाहीत. आज प्रत्येकजण या शोधात आहे की माझी जात कोणती आणि मला सवलती कशा मिळतील. हा जो संघर्ष निर्माण होतोय, तो टाळण्यासाठी आर्थिक निकषाचा विचार व्हावा.
ओबीसीची सवलत मिळणार असेल, तर ती सवलत गोपीनाथराव मुंडेंना मिळून उपयोग नाही आणि गरजही नाही. त्यामुळे माझा सांगायचा उद्देश हा आहे की आर्थिक निकषामध्ये तुम्ही ओबीसी जरी असला, तरी ते वर आहात. तुम्हाला त्याची आवश्यकता नाही. तसंच सगळेच देशमुख तुमच्या आमच्यासारखे नाहीत. अनेक देशमुख रोजगार हमीच्या कामावर आहेत. केवळ तो देशमुख आहे, म्हणून त्याच्यावर अन्याय करणार का आपण? हा खरा त्यातला प्रश्न आहे.
महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षाच्या नेतृत्त्वाने केवळ महाराष्ट्र म्हणूनच विचार केला आहे. संकुचित विचार केला नाही. वर्ष 2020 पर्यंत महाराष्ट्राच्या जडण घडणीत हीच माणसं (गोपीनाथ मुंडे, आर आर पाटील, मनोहर जोशी यांच्याकडे हात करुन) दिसतील. अर्थात मुंडे साहेब यांनी महाराष्ट्राचे स्वप्न पाहावे. ते पूर्ण करण्याचं काम आम्ही करु. (उपस्थितांचा हास्यकल्लोळ) तुम्ही दिशा द्या, त्याची अंमलबजावणीचं काम आम्ही आणि आर आर पाटील मिळून करु"