मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मुंबईत बोगस मतदारांचा सुळसुळाट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईतील मतदार यादीमध्ये सुमारे 8 ते 9 लाख बोगस मतदार असल्याचा गंभीर आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे.
मुंबईमध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये 15 ते 20 हजार, तर प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये एक ते दीड लाख बोगस मतदारांची नोंद झालेली आहे, असा दावा निरुपम यांनी केला आहे. निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने कडक पावलं उचलावीत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
एकाच व्यक्तीच्या नावे 11 ते 13 मतदान ओळखपत्रं आढळून आलेली आहेत. एखाद्या मतदारसंघात एक मतदार, परंतु त्याची विविध जाती-धर्माची वेगवेगळी नावं, वेगवेगळे पत्ते, वेगवेगळी वयोमर्यादा, वेगवेगळे बूथ नंबर मिळालेले आहेत, असा दावा संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
मागठाणे विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे आहेत. तिथे मतदार ओळखपत्रांमध्ये 838 पैकी फक्त 182 खरे मतदार आहेत, तर दिंडोशी विधानसभा मतदारसंघामध्ये जिथे शिवसेनेचेच आमदार सुनील प्रभू आहेत, तिथे 552 पैकी फक्त 290 खरे मतदार आहेत, असा आरोप संजय निरुपम यांनी केला.
सुमारे 15ते 20 हजार बोगस मतदार ओळखपत्रं अणुशक्ती नगर, मानखुर्द शिवाजी नगर आणि चांदिवली भागात सापडली आहेत. निवडणूक आयोगाने 31 जानेवारी 2019 पर्यंत ड्राफ्ट रोल जाहीर करण्यापूर्वी सर्व बोगस मतदार ओळखपत्र या मतदार यादीतून वगळावीत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मुंबईत आठ ते नऊ लाख बोगस मतदार : संजय निरुपम
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Jan 2019 01:27 PM (IST)
मुंबईमध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये 15 ते 20 हजार, तर प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये एक ते दीड लाख बोगस मतदारांची नोंद झालेली आहे, असा दावा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -