Mumbai: मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखेनं काश्मीरच्या श्रीनगरच्या परिसरातून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एकास अटक केलीय. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 6 नं श्रीनगर पोलिसांच्या मदतीनं ही कारवाई केलीय. गुलजार मकबूल अहमद खान असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. हा परिसर संवेदनशील असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांच्या पथकासह सुमारे 100 सशस्त्र कर्मचारी तैनात करण्यात आले. या भागातील अंमली पदार्थ विक्रेत्यांचे अंमली पदार्थांच्या दहशतवादाशी संबंध असलेल्या लोकांशी संबंध असल्याचे समजते. 


मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, खानला 8 जानेवारी रोजी श्रीनगरमधील मगरमल बाग येथून अटक करण्यात आली होती. मात्र, खराब हवामान आणि मुसळधार बर्फवृष्टीमुळे पोलीस तेथेच अडकल्यानं आरोपींना मुंबईत आणण्यास विलंब झाला. ड्रग्ज तस्करप्रकरणी आणखी माहिती मिळण्याची शक्यता असून ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.


मुंबई पोलिसांनी सांगितले की, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दहिसर टोल नाक्यावरून 24 किलो शुद्ध काश्मिरी चरससह चार जणांना अटक केल्यानंतरच खान एजन्सींच्या रडारखाली आला होता. उदयनशिव (वय, 52) त्याची पत्नी क्लारा (वय, 52), मुलगी सिंथिया (वय, 23), जस्सर जहांगीर शेख (वय, 24) असं त्यावेळी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. काश्मीरमधून चरस घेऊन परतत असताना या लोकांना अटक करण्यात आली.


मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचं एक पथक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात श्रीनगर गेलं होतं. आरोपीला त्यांच्या दुकानावरून अटक करण्यात आलीय. खानला अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांना अनेक अडचणी आल्या. कारण, हा परिसर संवेदनशील असून येथील वातावरण खराब होतं. मुसळधार बर्फवृष्टीमुळं तेथील बोगदा बर्फामुळं बंद झाल्यानं मुंबई पोलीस दोन दिवस तेथे अडकले होते.


प्राथमिक माहितीनुसार, खान अमली पदार्थांची तस्करी करायचा आणि मुंबईतील डिलर्स 25 टक्क्याची सूट देऊन ड्रग्ज पुरवठा करायचा, अशी माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. खानला यापूर्वी 2010 मध्ये वरळीच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं अमली पदार्थाशी संबंधित एका प्रकरणात अटक केली होती.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha