मुंबई : रेल्वे स्टेशनवर लिंबू सरबत किती गलिच्छ पद्धतीने तयार केलं जातं, हे दाखवणारा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मध्य रेल्वेने आता नवा तोडगा काढला आहे. रेल्वेने खुल्या सरबत विक्रीवर बंदी घातली आहे. यामध्ये केवळ लिंबू सरबतच नाही तर काला खट्टा, ऑरेंज ज्यूस यांसारख्या पेयांच्या विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे.


कुर्ल्यात हार्बर रेल्वे मार्गावरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 7 आणि 8 वर असलेल्या खाद्य पदार्थाच्या स्टॉलवर अतिशय घाणेरड्या पद्धतीने लिंबू सरबत बनवत असल्याचं समोर आलं होतं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या ढिसाळ कारभारावर तुफान टीका झाली. त्यामुळे मध्य रेल्वेने पाऊल उचलत खुल्या सरबत विक्रीवर बंदी घातली. परंतु सीलबंद पेयांची विक्री मात्र सुरुच राहणार आहे.

मुंबई विभागातील रेल्वे स्टेशनवर 13 मे 2013 रोजी लिंबू सरबतच्या विक्रीला परवानगी मिळाली होती. या परवानगीनुसार स्थानिक पेयं आणि विविध सरबतं स्थानकांतील स्टॉलवर विकण्याची मुभा रेल्वे प्रशासनाने दिली. मात्र सरबत परवानाधारकांकडून आरोग्याला घातक पद्धतीने बनवलं जात असल्याचं समोर आलं. शिवाय प्रवाशांच्या आरोग्याबाबत कोणतीही काळजी घेतली जात नाही, असं सांगत मध्य रेल्वेने खुल्या सरबत विक्रीच्या बंदीचा लेखी आदेश काढला.

दरम्यान, मध्य रेल्वेने स्टेशनमधील स्टॉलवर खुल्या सरबत विक्रीला बंदी घातली असली तरी, पश्चिम रेल्वेच्या लोकल स्टेशनवर सरबत किंवा खाद्यपदार्थांबाबत कोणतीही तक्रार आली नाही, असं पश्चिम रेल्वेने म्हटलं आहे. मुंबई विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सर्व स्टॉलची नियमित पाहणी आणि तपासणी करण्यात येत असल्याचं पश्चिम रेल्वेने सांगितलं.

VIDEO | रेल्वे स्थानकांवर लिंबू सरबत पिणाऱ्यांनो सावधान