मुंबई : फ्रांस नियतकालीक चार्ली हेब्दो याच्या वादग्रस्त मुखपृष्ठाचा वापर आपल्या दैनिकात करणाऱ्या संपादक शिरीन दळवी यांना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. स्टेट सीआयडीनं या प्रकरणी दाखल केलेला 'सी समरी' रिपोर्ट विचारात घेता हायकोर्टानं यासंदर्भातील याचिका निकाली काढली आहे. एखाद्या प्रकरणात जेव्हा तपासयंत्रणेला तक्रार ना खरी ना खोटी आढळते. आणि जेव्हा गुन्हा हा चुकून नोंदवला गेल्याचं लक्षात येतं तेव्हा हा 'सी समरी' रिपोर्ट कोर्टात दाखल केला जातो.


शिरीन दळवी यांनी 17 जानेवारी 2015 रोजी आपल्या 'अवधनामा' या दैनिकात महंम्मद पैंगबराचं 'ते' वादग्रस्त व्यंगचित्र एका लेखासोबत प्रदर्शित केलं होतं. जगभरात या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर मुंबईतही त्याविरोधात गदारोळ माजू लागला होता. तेव्हा पोलिसांनी दळवी यांना मुंब्रा इथून अटक केली होती.


त्यानंतर लागलीच दुसर्‍या दिवशी 19 जानेवारी 2015 रोजी त्यांनी घडलेल्या घटनेबाबत जाहीर माफीनामा आपल्या दैनिकात प्रसिद्ध केला होता. त्यानंतर आपला पेपर बंद करून दळवी आपल्या परिवारासह एका अज्ञात स्थळी निघून गेल्या होत्या. त्यांना तसेच त्यांच्या परिवारवाला जीवे मारण्याच्या धमक्या तसेच राज्यभरातील अनेक पोलीस स्टेशन्समधून त्यांच्या नावाचे समन्स त्यांच्या घरावर लावले जाऊ लागले.


याविरोधात दळवी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यावर यंत्रणा कुणालाही तक्रार दाखल करण्यापासून थांबवू शकत नाही, मात्र सर्व तक्रारी एका पोलीस स्थानकात वर्ग करुन कारवाई सुरू ठेवता येऊ शकते. असे निर्देश दोत त्यांच्याविरोधात कोणतीही कडक कारवाई न करण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते.


त्यानंतर वारंवार हायकोर्टानं दिलेला हा दिलासा कायम होत गेला. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून स्टेट सीआयडीकडे सोपवला होता. पोलिसांनी दळवी यांच्याविरोधात धार्मिक भावना दुखावल्याबद्दल आयपीसी 295 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला होता.