मुंबई : सोशल मीडियाच्या प्रभावी वापराचं उत्तम उदाहरण मुंबई पोलिसांनी नुकतंच घालून दिलं. व्हॉट्सअॅप ग्रुपच्या मदतीने पोलिसांनी अडीच वर्षांपूर्वी हरवलेल्या चिमुरड्याची आपल्या कुटुंबाशी पुन्हा भेट घडवून दिली. तीन वर्षांचा असताना शुभम मांडवकर कुर्ला रेल्वे स्टेशनजवळ हरवला होता. पोलिसांनी अकोल्यातून शोधून शुभमला त्याच्या पालकांकडे सुपूर्द केलं.


शुभम मांडवकर हा चिमुरडा 22 मार्च 2016 रोजी तीन वर्षांचा असताना नेहरुनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कुर्ला रेल्वे स्थानकाजवळून हरवला होता. नेहरुनगर पोलिसांनी त्यांच्या महाराष्ट्र पोलिसांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर शुभमची माहिती पाठवली. यावेळी त्यांना रेल्वे सुरक्षा बलाला अडीच वर्षांपूर्वी रेल्वेमध्ये सापडलेल्या आणि सध्या साडेपाच वर्षांच्या असलेल्या शुभमविषयी समजलं.

पोलिसांनी केलेल्या वर्णनाशी साधर्म्य असलेला मुलगा अकोल्यातील 'उत्कर्ष शिशु गृह'मध्ये असल्याचं समोर आलं. एका लहानग्याचा अडीच वर्षांनंतर शोध लागल्यामुळे फोटोवरुन ओळख पटवणं कठीण होतं. अकोला जिल्हा बालकल्याण अधिकारी आणि पोलिसांच्या मदतीने शुभमच्या पालकांना अकोल्याला पाठवून त्याची ओळख पटवून घेण्यात आली.

दोघांनी एकमेकांना ओळखलं आणि सुमारे अडीच वर्षांनंतर या हरवलेल्या लेकाची आपल्या पालकांशी भेट झाली. शुभमचे वडील विकी मांडवकर यांनी पोलिसांचे ऋण व्यक्त केले.