मुंबई : शरद पवारांनंतर आता काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आता काँग्रेस-राष्ट्रवादीसह सर्व विरोधकांनी मोट बांधायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच आघाडीला बळकटी देण्यासाठी आघाडीतील नेते मनसेला आघाडीत सामावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, माणिकराव ठाकरे आणि राज ठाकरेंमधील ही भेट राजकीय नसून सदिच्छा भेट असल्याचे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावेळी आघाडीत मनसेला घेण्यासाठी काँग्रेस अनुकूल नव्हती. त्यामुळे आता विधानसभेला घड्याळ (राष्ट्रवादी) आणि हाताला (काँग्रेस) मनसेच्या इंजिनाची साथ लाभणार का? हे पाहणे औत्सुकक्याचे ठरेल.

माध्यमांच्या प्रतिनिधींनी माणिकराव ठाकरे यांना मनसेला आघाडीत घेण्याबाबत विचारले असता, माणिकराव ठाकरे म्हणाले की, दोन्ही पक्षांमधील वरिष्ठ नेते मनसेच्या आघाडीतील प्रवेशाबाबत निर्णय घेतील.

बुधवारी (काल) आघाडीतील नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. पवारांच्या निवासस्थानी या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊण तास राजकीय चर्चा झाली. दरम्यान, काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीदेखील राज ठाकरे यांची भेट घेतली होती.

राज ठाकरे आणि शरद पवारांमध्ये चर्चा, मनसेला आघाडीत एन्ट्री? | मुंबई | ABP Majha



दोन दिवसात शरद पवार, राजू शेट्टी, माणिकराव ठाकरे या तीन नेत्यांसोबतच्या राज ठाकरेंच्या भेटींमुळे विधानसभेच्या तोंडावर मनसेला आघाडीत सामावून घेण्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.

VIDEO | राजू शेट्टी राज ठाकरेंच्या भेटीला | मुंबई | ABP Majha