Waterlogging in Mumbai : मुंबईतल्या पहिल्याच पावसाने नालेसफाईच्या दाव्यांची पोलखोल केली. अंधेरी भागात झालेल्या पावसाने पाणीच पाणी अशी स्थिती रस्त्यावर झाली होती. पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की, लोकांना आधार देऊन सुरक्षित ठिकाणी घेऊन जावं लागत होतं. पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या एका महिलेला अशाच प्रकारे सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं. काही चार चाकी वाहनांच्या टायरच्या लेव्हलपर्यंत पाणी आलेलं पाहायला मिळालं. फ्रिज,कपाट,पलंग, ताडपत्री, रबरी पाईप यासारख्या वस्तू वाहून आल्याने अंधेरी सबवेमध्ये पाणीच पाणी झाले होते. या साहित्यामुळेअंधेरी भूयारी मार्गाची पंपिंग स्टेशन यंत्रणाविस्कळीत झाली होती. युद्ध पातळीवर राबून महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी अवघ्या तासभरात यंत्रणा पुन्हा कार्यान्वित केली. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी पाहणी आज पाहणी केली. 
 
अंधेरी भूयारी मार्गाजवळून वाहणाऱ्या मोगरा नाल्यातून वाहून आलेला 165 लीटरचा फ्रीज तसेच कपाट, पलंग, ताडपत्री, रबरी पाईप आणि यासारख्या इतर साहित्यांनी शनिवारी सायंकाळी अंधेरी भूयारी मार्गाची पावसाळी पाणी पंपिंग स्टेशन करणारी यंत्रणा विस्कळीत करून टाकली. असे असले तरी, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे तसेच के पूर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कामगार यांनी अवघ्या तासभरात सर्व यंत्रणा पूर्ववत करून साचलेल्या पाण्याचा वेगाने निचरा केला.


अंधेरी भूयारी मार्ग हा मुंबईतील अतिसखल परिसरांपैकी एक आहे. अंधेरी भूयारी मार्ग ठिकाणाचा भौगोलिक आकार हा बशीसारखा आहे. महानगरपालिकेच्या यंत्रणेने वारंवार काढून नाल्यांचा प्रवाह वाहता राहील याची पुरेपूर दक्षता घेतली आहे. असे असताना, शनिवारी सायंकाळी जोरदार पाऊस होत असताना मोगरा नाल्यातील प्रवाह सोबत अतिशय मोठ्या प्रमाणावर तरंगता कचरा अंधेरी भूयारी मार्गाच्या दिशेने आला. त्यामध्ये 165 लीटर क्षमतेचा फ्रीज, कपाट, पलंग, इतर अवजड साहित्य तसेच ताडपत्री, रबरी पाईप, नायलॉन चटई इत्यादी अनेक वस्तू होत्या.


हे सर्व अवजड साहित्य अंधेरी भूयारी मार्ग लगत नाल्यामध्ये कचरा रोखण्यासाठी लावलेल्या जाळीत अडकले. त्यापाठोपाठ येणारा इतर सर्व कचरा देखील जाळीत अडकला. परिणामी नाल्याचा प्रवाह पुढे न जाता ओसंडून रस्त्यावर आला आणि भूयारी मार्ग तुंबला. सदर अवजड साहित्य, तरंगता कचरा आणि त्यावरून पाण्याचा प्रचंड दबाव यामुळे सदर पोलादी जाळी तुटली. दरम्यान, हे सर्व घडत असताना, दुसऱ्या बाजूला पाणी उपसल्यानंतर त्याचा प्रवाह आपल्या भागात सोडण्यात येत असल्याची हरकत घेवून काही स्थानिक नागरिकांनी पंपिंग स्टेशन व्यवस्था देखील बंद पाडली. या सगळ्यांचा परिपाक म्हणून सदर परिसरात पाणी साचले.


या बिकट परिस्थितीत देखील गोंधळून न जाता पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे तसेच के पूर्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी जलद हालचाली करून संयमाने परिस्थिती हाताळली. नाल्यातील जाळी ताबडतोब काढून, तसेच शक्य तेवढा तरंगता कचरा काढून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यात आला. तसेच संबंधित स्थानिक नागरिकांचा गैरसमज दूर करून उदंचन यंत्रणा सुरू करण्यात आली. त्यामुळे अवघ्या तासभराच्या आत अंधेरी भूयारी मार्गातील पाण्याचा निचरा करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. दरम्यान, अंधेरी भूयारी मार्गातील पावसाळी पाणी निचरा करण्यासाठी सध्या केलेली पंपिंग व्यवस्था ही तात्पुरती व्यवस्था आहे. आयआयटी मुंबईने सुचविलेल्या दीर्घकालीन उपायांचा महानगरपालिका प्रशासनाकडून आढावा घेतला जाईल आणि त्यानुसार पुढील पावसाळ्यापूर्वी त्याची अंमलबजावणी केली जाईल, असेही महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.