मुंबई : तुम्ही ज्या गोष्टी केल्याच नाहीत त्याची अपेक्षा आता आमच्याकडून करत आहात, पंधरा वर्षे नालेसफाईची घाण तुंबली आहे, ती काढायला वेळ तर लागणारच ना असा आदित्य ठाकरे यांना टोला शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी लगावला आहे. ईडी आणि एसआयटी लागल्यावर काय करू आणि काय नाही अशी परिस्थिती यांच्यावर आली आहे असंही ते म्हणाले.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर खरपूस टीका केली. ते म्हणाले की, कोविड काळात सर्वसामान्य नागरिक जीव वाचवण्यासाठी आटापीटा करत असताना मुंबई महापालिकेत मात्र त्यांना लुटण्याचे काम होत होते. कोविड मधील मतदेहासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग ठाण्यात अवघ्या 350 रुपयांना मिळत असताना त्याच बॅगेसाठी मुंबई महापालिका तब्बल 6 हजार 700 रुपये का मोजत होती? आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असे बिरुद मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेची ओळख आशिया खंडातील सर्वात भ्रष्ट महापालिका अशी उद्धव ठाकरेंच्या 15 वर्षांच्या कालावधीत झाली. कोविड काळात एकीकडे माणसे मरत होती आणि हे मात्र त्यांना लुटायचे काम करत होते. 15 वर्ष उद्धव ठाकरेंच्या ताब्यात महापालिका असतानाही मुंबईकरांच्या, मराठी माणसांच्या आयुष्यात फारसे बदल घडलेले दिसत नाहीत.
खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याऐवजी आधी आपल्या 15 वर्षांच्या कार्यकालाचे उत्तर जनतेला द्यावे असे ते म्हणाले. आमच्यावर खोके खोके असा आरोप करणाऱ्यांनी कुणाला किती खोके मिळाले हे लवकरच एसआयटीच्या चौकशीतून समोर येईल, हे विसरु नये. ईडीच्या चौकशीत सूरज चव्हाण, सुजीत पाटकर यांचे धागेदोरे कुणापर्यंत गेले आहेत हे स्पष्ट होईल असे ते म्हणाले. कोळीवाड्यातील घरे छोटी झाली आणि कुटुंबे मोठी झाली आहेत त्यांना चांगले घर मिळावे यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
श्रीकांत शिंदे म्हणाले की, मुंबईतील खरा भुमीपुत्र आगरी आणि कोळी आहे. कोळीवाड्यासाठी विशेष धोरण आखण्याबाबत सकारात्मक काम सुरु आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत आश्वासन दिले आहे. एसआरए आणि म्हाडामध्ये हक्काचे घर मिळतील यासाठी काम सुरु आहे. मुंबईकरांना भेडसावणारी सर्वात मोठी समस्या घरांची आहे. गेली अनेक वर्षे सत्तेत असलेल्यांकडून या महत्त्वाच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले. 15 वर्ष महापालिकेवर सत्ता असताना कामे झाली नाहीत, मात्र एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी राज्य सरकारने क्लस्टर धोरण आखले, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्याचे भूमीपूजन करण्यात आले. स्वतःचे हक्काचे घर देण्यात येणार आहे. सिडकोच्या माध्यमातून दोन वर्षाच्या कालावधीत ही घरे बांधून देण्यात येतील. ठाण्याप्रमाणे आम्ही मुंबईत देखील काम करु अशी ग्वाही त्यांनी दिली. म्हाडा, एसआरए मधील लोकांसाठी घरे देण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, त्यावर सकारात्मक प्रतिसाद मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी 'दिला आहे.
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेत सत्ता असताना मराठी माणसांना, शिवसैनिकांना काय मिळाले याचा विचार करण्याची वेळ आली आहे. मराठी माणसांना मुंबई सोडून ठाणे, कल्याण डोंबिवली जावे लागत आहेत. त्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हेच कारणीभूत आहेत, असा आरोप श्रीकांत शिंदे यांनी केला.
मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे स्वतः सक्रिय असल्याने प्रशासन देखील सक्रिय झाले आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांना बाजूला सारुन मुंबई महापालिकेत चांगले काम करुन मुंबई महापालिकेतील भ्रष्ट्राचार बंद करण्यास मुख्यमंत्र्यांनी प्राधान्य दिले आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्ट्राचाराची नालेसफाई मुख्यमंत्री पूर्ण ताकदीने करतील, असे शिंदे म्हणाले. शिवसेना शाखा संपर्क अभियानाच्या माध्यमातून मुंबईच्या विविध भागांत जावून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. गेल्या ११ महिन्यात मुख्यमंत्री राज्याच्या कानाकोपऱ्यात जावून काम करत आहेत. राज्याचा विकास करत आहेत.
गेल्या अनेक वर्षात घेण्यात आले नाहीत असे अनेक निर्णय अवघ्या 11 महिन्यात घेण्यात आले आहेत असं श्रीकांत शिंदे म्हणाले. ते म्हणाले की, आतापर्यंत 25 ते 30 शाखांना भेटी दिल्या. तळागाळातील शिवसैनिक कार्यरत आहेत. मुख्यमंत्र्यांवर विश्वास असल्याने एवढ्या पावसात देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत. मी जिथे जिथे जातो त्या ठिकाणी नागरिक येतात. त्यांच्या विश्वासाला आम्ही पात्र ठरु यासाठी काम सुरु आहे. विविध समस्या जाणून घेतल्या आहेत. समस्या केवळ ऐकून घेतल्या नाही तर त्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला पाठवले आहे.
राज्याला दिवसरात्र लोकांमध्ये राहणारा मुख्यमंत्री मिळाला आहे. भगव्याला पुढे घेऊन जाणारे पाऊल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घेतले आहे. शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करत आहेत असंही श्रीकांत शिंदे म्हणाले.