मुंबई : वृत्तपत्र आणि सोशल मीडियावर सध्या महिलांवरील बलात्कार, लैंगिक शोषण यांच्यासारख्या बातम्यांनी भरलेले दिसत आहेत. सकाळी वृत्तपत्र किंवा मोबाईल फोन हातात घेताच एखादी धक्कादायक बातमी वाचायला मिळेल असं वाटत राहतं. पण याचवेळी अशाही घटना घडतात, ज्यात माणुसकीचं दर्शन घडतं. नैसर्गिक आपत्ती असो वा अनुचित घटना यावेळी मुंबईचं स्पिरीट पाहायलं मिळतं. मात्र बेस्ट चालक आणि कंडक्टनरने दाखवलेली माणुसकी 25 वर्षीय मंताशा शेख कधीच विसरणार नाही.


4 ऑक्टोबरला रात्री उशिरा घरी परत येताना आलेला अनुभव 25 वर्षीय मंताशा शेखने ट्विटरवर शेअर करत दोघांचेही आभार मानले आहेत. मंताशाच्या ट्वीटला आतापर्यंत 3 हजारांपेक्षा जास्त जणांनी रिट्वीट केलं असून 8 हजारांपेक्षा जास्त ट्विपल्सनी ते लाईक केलं आहे.

म्हणून माझं मुंबईवर प्रेम आहे
398 लिमिटेड या बस चालकाचे मला आभार मानायचे आहेत. रात्री दीडच्या सुमारास मी निर्मनुष्य बस स्टॉपवर उतरले. घरातून घ्यायला कोणी येणार आहे का, अशी विचारणा त्यांनी केली. मी नकारार्थी मान हलवली. मला रिक्षा मिळेपर्यंत त्यांनी बस तिथेच थांबवली. @WeAreMumbai, असं ट्वीट मंताशाने केलं आहे.


मुंबई मिररशी बोलताना मंताशा म्हणाली की, "नातेवाईकांकडून परत येताना वेळेचं भान राहिलं नाही. मी साकीनाकावरुन आरे कॉलनीमधील, रॉयल पाल्म इथल्या माझ्या घरी जाण्यासाठी बेस्ट बसमध्ये चढले. मी आरे कॉलनीच्या निर्मनुष्य बस स्टॉवर रात्री दीडच्या सुमारास पोहोचले. बसचे चालक प्रशांत मयेकर आणि कंडक्टर राज दिनकर यांनी मला घरातून कोणी घेण्यासाठी येणार आहे का अशी विचारणा केली. पण मी नकारार्थी मान हलवल्यानंतर त्यांनी बस एका बाजूला पार्क केली आणि रिक्षा मिळेपर्यंत तिथेच थांबून राहिले. मला रिक्षा मिळाल्यानंतर ती योग्य दिशेने जात असल्याची खात्री झाल्यानंतरच चालक प्रशांत यांनी बस सुरु केली."

प्रशांत मयेकर आणि राज दिनकर हे दोघेही जवळपास दशकभरापासून बेस्टमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्यावर होत असलेल्या कौतुकाचा त्यांनी विनम्रतेने स्वीकार केला. "आम्ही फक्त आमचं काम करत होतो, जे आम्हाला प्रशिक्षणादरम्यान शिकवलं होतं," असं दोघांनीही सांगितलं.

राज दिनकर म्हणाले की, "प्रशिक्षणादरम्यान महिला, वृद्ध आणि मुलांचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायी कसा होईल, याची नियमावली दिली जाते. महिला प्रवाशांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वोच्च स्थानी आहे. सामान्यत: महिला किंवा वृद्धच बसमधून उतरणारे शेवटचे प्रवासी असतात. आरे कॉलनीसारख्या निर्मनुष्य असलेल्या बस स्टॉपवर प्रवाशांना उतरवताना जास्तच काळजी घेतो."

"त्यांचं छोटं कृत्य माझ्यासाठी फारच मोठं होतं. माझे कुटुंबीय तिथे नसतानाही ते जवळ असल्याचा भास झाला. मुंबईचं माझ्यावर लक्ष होतं. यामुळे मी पुन्हा एकदा या शहराच्या प्रेमात पडले," असं मंताशा सांगते.