मुंबई : काँग्रेस मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उत्तर भारतीयांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. उत्तर भारतीयांनी मुंबईत काम बंद केलं तर मुंबई ठप्प होईल हे मान्य नाही, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी संजय निरुपम यांच्या वक्तव्यावर बोलातान म्हटलं.


आठवले पुढे म्हणाले की, "निरुपम यांनी मराठी भाषिक आणि उत्तर भारतीयांमध्ये वाद निर्माण करू नये. असा वाद निर्माण करून काँग्रेसला काही फायदा होणार नाही. याउलट अशा विधानांनी मराठी भाषिकांच्या नाराजीचा काँग्रेसला फटका बसण्याची जास्त शक्यता आहे."


उत्तर भारतीयांचे मुंबईसाठीचं योगदान मोठं आहे, यात दुमत नाही. मात्र त्यांनी कामबंद केल्यानं मुंबई ठप्प होईल हे मान्य नसल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलं.


मुंबईकरांबद्दल काय म्हणाले निरुपम?


नागपुरात उत्तर भारतीयांच्या वार्षिक सभेत बोलताना निरूपम म्हणाले की,  “लक्षात ठेवा उत्तर भारतीय वर्ग महाराष्ट्र चालवतो... मुंबईला चालवतो... दूध, भाजी, वर्तमानपत्र विकून आणि ऑटो टॅक्सी चालवून उत्तर भारतीय समाजच मुंबईकरांचे जीवन चालवितो... उत्तर भारतीय समाज स्वतःच्या खांद्यावर मुंबईकरांचे ओझे वाहतो... जर एके दिवशी उत्तर भारतीयांनी ठरवलं की आज कामावर जायचं नाही आणि फक्त एक दिवस काम केलं नाही तर पूर्ण मंबई ठप्प होईल... मुंबईच्या लोकांना जेवायलाही मिळणार नाही... आमची तशी इच्छा नाही... मात्र त्यासाठी आम्हाला मजबूर करू नका,” अशी धमकीच संजय निरुपम यांनी दिली.


काय आहे गुजरातमधील प्रकरण?


गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यात गेल्या आठवड्यात 14 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका बिहारच्या व्यक्तीला अटक केली आहे. घटनेनंतर गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांना लक्ष्य केलं जात आहे.


पोलिसांच्या माहितीनुसार, साबरकांठा जिल्ह्यातील एका गावात 14 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बिहारच्या रवींद्र साहू नावाच्या एका व्यक्तीला घटनेच्या दिवशीच अटक करण्यात आली. परराज्यातील लोकांवर हल्ल्याप्रकरणी गुजरातमध्ये विविध जिल्ह्यात आतापर्यंत 18 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.