मुंबई : सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांच्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विरोधाचे सूर आहेत. त्यातच आता रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे (रिपाइं-आठवले गट) नेते रामदास आठवले यांनी उदयनराजेंना ऑफर दिली आहे. "सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्यास रिपाइंकडून लढावं," अशी ऑफर आठलेंनी दिली आहे. रामदास आठवले मुंबईत बोलत होते.
"उदयनराजेंना राष्ट्रवादी काँग्रेसचं तिकीट मिळण्याची शक्यता धूसर आहे. त्यांच्या जागी श्रीनिवास पाटील यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी उदयनराजेंना विनंती करतो त्यांनी आमच्या पक्षात यावं. आम्ही उदयनराजेंना निवडून आणू," असं आठवले म्हणाले. तसंच यासंदर्भात त्यांना फोन करणार असल्याचंही आठवलेंनी सांगितलं.
लोकसभेसाठी किती जागांची मागणी करणार?
आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. "मात्र शिवसेनासोबत आल्यास लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही दोन जागांची मागणी करणार आहे. शिवसेना सोबत आली नाही तर चार जागांची मागणी करणार आहे," असं रामदास आठवले यांनी सांगितलं. "तसंच युती झाल्यास पालघर लोकसभेची जागा शिवसेनेला आणि मला दक्षिण-मध्य मुंबईची जागा देण्यास काही हरकत नाही," असंही आठवले म्हणाले.
डॉ. आंबेडकर स्मारकाबाबत मुख्यमंत्र्यांनी बोलणार
इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या उंचीवरुन वाद सुरु आहे. त्याबाबत आठवले म्हणाले की,"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून पुतळ्याच्या उंची वाढवण्याबाबत बोलणार आहे. 6 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांना बोलवण्यात येणार आहे. तेव्हा कामाला सुरुवात होईल. आंबेडकरांचा पुतळा 260 फुटांचा असून त्याचा बेस 90 फुटांचा आहे. या स्मारकाचं काम 2020 पर्यंत पूर्ण होईल."
पदोन्नतीत आरक्षणाचा कायदा करावा
मॅटने पदोन्नतीमधील आरक्षण बेकायदेशीर असल्याचं सांगत राज्यातील 154 फौजदारांच्या नियुक्तीला स्थगिती दिली. याबाबत बोलताना रामदास आठवले म्हणाले की, "बढतीमधील आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. यासंदर्भात मी दोन दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे. हा निर्णय सवर्णांच्या विरोधात नाही. सरकारने पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा कायदा करावा."
रिपाइंला मंत्रिपद मिळेल!
मंत्रिमंडळ विस्तारावर रामदास आठवले म्हणाले की, "या आठवड्यात विस्तार होईल, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे. रिपाइंला दिलेली आश्वासनं मुख्यमंत्री पाळतील आणि राज्यात आरपीआयला एक मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा आम्हाला आहे."