मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने नवजात बालकांची विक्री व खरेदी करणार्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी 7 महिला आणि 2 पुरुषांसह 9 जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये एक डॉक्टर, एक नर्स आणि एक लॅब टेक्निशियनचा समावेश आहे. गुन्हे शाखेच्या युनिट 1 चे अधिकारी योगेश चव्हाण यांनी सांगितले की, ही टोळी मुलांच्या जन्मादात्यांकडून 60 हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत बाळांना विकत घेत असे आणि नंतर ज्या जोडप्यांना बाळांची गरज आहे अशांना अडीच लाख ते साडेतीन लाख रुपयांना विकत असे.
अटक केलेल्या आरोपींमध्ये रुपाली वर्मा, निशा अहिरे, गुलशन खान, गीतांजली गायकवाड (नर्स), आरती सिंग (लॅब टेक्निशियन) आणि धनंजय बोगे(डॉक्टर) यांचा समावेश आहे. तीन आरोपींची नावं गुप्त ठेवण्य़ात आली आहेत. त्यापैकी दोन बाळांचे जन्मदाते आहेत तर एक आरोपी बाळाची खरेदी करुन पालनपोषण करत आहे.
टोळीचा पर्दाफाश कसा झाला?
वांद्रे येथील खेरवाडी भागात काही लोकांनी मुलांची विक्री केली, तर कुणीतर बाळ विक्रीस मदत केली असल्याची माहिती क्राईम ब्रान्चला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तेथे सापळा लावला आणि तीन जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान या संपूर्ण टोळीविषयी माहिती मिळाली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
टोळीचं काम कसं चालायचं?
डॉक्टर, परिचारिका आणि लॅब टेक्निशियन या टोळीचे मुख्य सदस्य आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. ज्यांना बाळ हवं आहे अशा जोडप्यांचा हे लोक शोध घेत असत. तसेच ज्यांच्याकडे मुल आहे पण त्याचं संगोपण करणे त्यांना शक्य नाही अशा जोडप्यांचाही ते शोध घेत असत. त्यानंतर ते त्यांच्या टोळीतील दलालांना याविषयी माहिती देत असत आणि मग दलाल दोन्ही जोडप्यांना मुलाला विकण्यासाठी व खरेदी करण्यासाठी बोलणी सुरु करत असे.
ज्या जोडप्यांना मुल हवं आहे त्यांच्याकडून ते अडीच ते तीन लाख रुपयांची मागणी करत असत. आणि मुलाला विकण्याच्या बदल्यात ते 60 ते दीड लाख रुपयांची ऑफर देत असत. या व्यवहारातून उरलेले पैसे हे सर्वजण आपापसात वाटून घेत असे. प्राथमिक तपासात गुन्हे शाखेने या टोळीमार्फत बेकायदेशीरपणे खरेदी केलेल्या तीन मुलांचा शोध घेतला आहे.
गेल्या 6 वर्षांपासून ही टोळी हे काम करत असल्याचं तपासात उघडकीस आलं आहे. एकट्या गीतांजलीने जी नर्स आहे तिने आतापर्यंत 6 मुलांची विक्री केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या सर्व आरोपींचे मोबाईल फोन ताब्यात घेऊन ते फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले आहेत. जेणेकरून या टोळीने किंती बालकांची खरेदी विक्री केली आहे याची माहिती मिळेल.
मुल दत्तक घेण्याचा कायदेशीर प्रक्रिया
केंद्र सरकारने मुल दत्तक घेण्यासाठी केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण, म्हणजेच सीएआरएची स्थापना केली आहे. ही संस्था नोडल बॉडीसारखे कार्य करते. ज्याद्वारे अनाथ, आत्मसमर्पण केलेल्या मुलांना दत्तक दिलं जातं.