मुंबई : मुंबईतल्या सायलेन्स झोनबद्दल सरकारनं ठोस भूमिका घ्यावी, नाही तर सायलेंस झोनमध्येच गणेशोत्सव साजरा करणार, असा इशारा शिवसेनेनं दिला आहे. मुंबईतील सायलेन्स झोनच्या निर्णयाला शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी विरोध दर्शवला आहे.


गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पालिकेत बैठक पार पडली. न्यायालयाच्या आदेशानं कोणतेही सण बंद होत नसतात. सायलेन्स झोनमध्ये बंदी घातली तर मुंबईतील 80 टक्के गणेशोत्सव बंद पडतील, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.

सायलेन्स झोनमध्ये पोलिसांना कोणतीही परवानगी देण्याचा अधिकार नाही, असं सांगण्यात आलं आहे.
80 टक्के गणेशोत्सव हे सायलेन्स झोनमध्ये आहेत, त्यामुळे पोलिस यांना संमती देण्यास नकार देतील, तर मुंबईत गणेशोत्सव कसा साजरा होणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मुंबईतील भौगोलिक परिस्थिती पाहता सायलेन्स झोनमध्ये अनेक गणेशोत्सव मंडळ आहेत. मुंबईतील उत्सव हे केवळ कोर्टाच्या आदेशाने बंद होत असतील तर शिवसेना याला विरोध करेल न्यायालय कायदा बघतं, लोकांची श्रद्धा बघत नाही, सरकारने आता याचा विचार करावा. याबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक लावावी, असं पत्र अनिल परब मुख्यमंत्र्यांना देणार आहेत.