मुंबई : मुंबईतील मोठ्या गृहनिर्माण संकुलातील ओला कचरा दोन ऑक्टोबरपासून महापालिका उचलणार नाही. घनकचरा व्यवस्थापन खात्याला मुंबई महापालिकेने तसे आदेश दिले आहेत.
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील ज्या रेसिडेन्शिअल कॉम्प्लेक्सचा एकूण एरिआ हा 20 हजार स्क्वेअर मीटर किंवा त्यापेक्षा जास्त आहे, तसंच ज्या संकुलांमधून दररोज 100 किलो किंवा त्यापेक्षा अधिक कचरा निर्माण होत आहे, अशा संकुलांनी आपापल्या परिसरात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्याची विल्हेवाट संकुलातच लावायची आहे. तसे आदेश यापूर्वीच महापालिकेने संबंधित संकुलांना दिले होते. आता याबाबत पुन्हा एकदा नोटीस देण्याचेही आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.
याच्या अंमलबजावणीसाठी संबंधित संकुलांना तांत्रिक मार्गदर्शनाबाबत जी काही मदत लागेल ती महापालिकेद्वारे देण्याचेही आदेशही संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. विभाग स्तरावर सुक्या कचऱ्याचा लिलाव कशाप्रकारे करता येईल? याबाबत पूर्व उपनगराच्या अतिरिक्त आयुक्तांना लवकरात लवकर नियोजन करायचं आहे.