मुंबई : मुंबईत मनोविकाराने त्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. महापालिकेच्या चार प्रमुख रुग्णालयांमध्ये सर्वाधिक म्हणजे 31 टक्के रुग्ण हे मनोविकारांशी संबंधित, तर त्याखालोखाल सुमारे 23 टक्के रुग्ण हे रक्तदाब आणि मधुमेहाचे असल्याचे आढळून आलं आहे.

बृहन्मुंबई महापालिकेची चार प्रमुख रुग्णालयं, 15 उपनगरीय रुग्णालयं आणि 175 दवाखान्यांमध्ये ऑक्टोबर 2015 ते सप्टेंबर 2017 या दोन वर्षांच्या कालावधीत आलेल्या रुग्णांपैकी 72 लाख 61 हजार 130 रुग्णांशी संबंधित माहितीचं अभ्यासपूर्ण विश्लेषण करुन हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

याव्यतिरिक्त सात दिवस रुग्णालयात वा दवाखान्यात प्रत्यक्ष जाऊन, त्या सात दिवसात आलेले बाह्यरुग्ण किंवा आंतररुग्ण म्हणून दाखल झालेल्या एक लाख 13 हजार 472 रुग्णांच्या माहितीचा अभ्यास करण्यात आला. यानुसार तब्बल 73 लाख 74 हजार 602 रुग्णांच्या माहितीवर आधारित अभ्यास अहवाल नुकताच महापालिका प्रशासनाला सादर करण्यात आला आहे.

रुग्णसंख्येच्या प्रमाणानुसार क्रमवारी ठरवल्यास त्यामध्ये मनोविकार आणि रक्तदाब-मधुमेहानंतर श्वान/प्राणी दंश, हृदयविकार, डेंग्यू, दमा, अनाकलनीय ताप, जुलाब आणि मलेरिया या आजारांचा समावेश आहे. याचप्रमाणे महापालिकेच्या 15 उपनगरीय रुग्णालयांमध्ये आणि 175 दवाखान्यांमध्ये येणाऱ्या रुग्णांमध्येही जीवनशैलीशी निगडीत आजारांचे (Lifestyle Diseases) मोठे प्रमाण आढळून आले आहे.

बृहन्मुंबई महापालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या आरोग्य आणि वैद्यकीय सेवा सुविधांशी संबंधित भविष्यातील दिशा निश्चित करण्याच्या प्रमुख उद्देशाने हा अहवाल तयार करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. शीव परिसरातील 'लोकमान्य टिळक मनपा सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय' येथील समुदाय औषधशास्त्र विभाग (Community Medicine Dept.) आणि महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे संयुक्तपणे हा अभ्यास प्रकल्प करण्यात आला. शीव रुग्णालयातील समुदाय औषधशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. सीमा बनसोडे -गोखे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात 51 तज्ज्ञ डॉक्टर मंडळीसह संबंधित कर्मचारी सलग सात महिने या प्रकल्पावर काम करत होते.

प्रमुख 4 रुग्णालयातील दोन वर्षातील रुग्ण संख्येचा अभ्यास

महापालिकेच्या चार प्रमुख रुग्णालयांमध्ये म्हणजेच केईएम, सायन, नायर आणि कूपर रुग्णालयांमध्ये ऑक्टोबर 2015 ते सप्टेंबर 2017 या दोन वर्षांच्या कालावधीत येऊन गेलेल्या रुग्णांपैकी पाच लाख 59 हजार 954 रुग्णांची माहिती अभ्यासण्यात आली.

यामध्ये सर्वाधिक म्हणजे 31.14 टक्के रुग्ण हे मनोविकारांवरील (Psychiatric Disorders) उपचारांसाठी आल्याचे दिसून आले.

मधुमेह  - 23.22 टक्के,

रक्तदाब - 22.78 टक्के,

श्वान/प्राणी दंश 9.95 टक्के,

हदयविकार 7.49 टक्के,

डेंग्यू 1.5 टक्के,

दमा-अस्थमा 1.4 टक्के,

अनाकलनीय ताप (FUO / Fever of Unknown Origin) 1.38 टक्के,

जुलाब 0.61 टक्के

हिवताप (Malaria) 0.53 टक्के

15 उपनगरीय रुग्णालयातील दोन वर्षातील रुग्ण संख्येचा अभ्यास

महापालिकेच्या 15 उपनगरीय रुग्णालयांमध्ये ऑक्टोबर 2015 ते सप्टेंबर 2017 या दोन वर्षांच्या कालावधीत येऊन गेलेल्या रुग्णांपैकी पाच लाख 26 हजार 605 रुग्णांची माहिती अभ्यासण्यात आली.

यामध्ये अनाकलनीय तापाचे सर्वाधिक म्हणजे 33.17 टक्के रुग्ण असल्याचे दिसून आले.

मधुमेह 19.84 टक्के,

रक्तदाब 16.02 टक्के,

श्वानदंश 9.87 टक्के,

मनोविकार 8.24 टक्के,

दमा 6.11 टक्के,

जुलाब 2.47 टक्के,

डेंग्यू 2.03 टक्के,

हिवताप (Malaria) 1.26 टक्के

विषमज्वर 0.98 टक्के