26/11 Terror Attack Victim : 26/11 ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Mumbai Terror Attack) कसाबच्या गोळीनं जखमी झालेल्या अल्पवयीन पीडितेनं घर मिळावं यासाठी हायकोर्टात (High Court) याचिका दाखल केली आहे. नुकसान भरपाई म्हणून घर मिळावं यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला 7 फेब्रुवारीच्या पुढील सुनावणीत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी व न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.
काय आहे प्रकरण?
आपल्याला आर्थिक दुर्बल घटकातून घर द्यावं, या मागणीसाठी हल्ल्याच्या वेळी अल्पवयीन असलेल्या या मुलीने वर्ष 2020 मध्ये राज्य सरकारकडे अर्ज केला होता. हा अर्ज बराच काळ प्रलंबित असल्यानं हायकोर्टात धाव घेतली होती. तेव्हा या अर्जावर निर्णय घेण्याचे आदेश हायकोर्टानं गेल्या वर्षी राज्य सरकारला दिले होते. या अर्जावर अद्यापही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचं या याचिकेतून न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आलं आहे.
मात्र 26/11 हल्ल्यातील सर्व जखमींना नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे, असे सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी हायकोर्टाला सांगितलं. जर जखमींना नुकसान भरपाई दिली असेल तर घर कसं देता येईल?, असा सवाल यावेळी न्यायालयानं उपस्थित केला. त्यावर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार जखमींना नुकसान भरपाई म्हणून घर देण्याची तरतूद आहे, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्यावतीने करण्यात आला. सरकारनं आमच्या अर्जावर निर्णय घ्यावा, किमान पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घर देता येईल अशी मागणी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केली.
कोण आहे याचिकाकर्ती देविका रोटवन?
26/11 च्या हल्ल्यात कसाब सीएसएमटी स्थानकासमोरील एका गल्लीत घुसला होता. तेथील एका चाळीत कसाबनं गोळीबार केला. या गोळीबारात त्यावेळी असलेली 8 वर्षांची देविका गंभीर जखमी झाली होती. ज्यात तिच्या पायाला गोळी लागली. त्यावेळच्या राज्य सरकारनं आपल्याला नुकसान भरपाई म्हणून घर आणि शिक्षणाचा खर्च करण्याची हमी दिली होती. मात्र हे आश्वासन अद्याप पूर्ण केलेलं नाही. तिला 13 लाख रुपये नुकसानभरपाई दिली गेली, मात्र हे सारे पैसे उपचारांसाठीच खर्च झाले. त्यामुळे शिक्षणाचा खर्च आणि कबूल केल्याप्रमाणे घर देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.
26/11 च्या खटल्यात देविकाची साक्ष अतिशय महत्त्वाची ठरली होती. ती या घटनेची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होती. विशेष न्यायालयात देविकानं निर्भिडपणे साक्ष देत आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या कसाबनंच गोळीबार केल्याचं कोर्टाला सांगितलं होतं. गोळी लागल्यानं त्यावेळी देविकाला चालताही येत नव्हतं. तरीही तिनं न्यायालयात येऊन साक्ष दिली होती. दरम्यान देविकाच्या आईचं निधन झालं असून वडील व भाऊ, असं तिचं छोटं कुटुंब आहे.