Mumbai Trans Harbour Link Toll :  शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू (Mumbai Shivadi Nhava Sheva Mumbai Trans Harbour Link) 12 जानेवारीपासून सेवेत आणण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते या सागरी सेतूचे  उद्घाटन करण्यात येणार आहे. या सागरी सेतूवर वाहनांना किती टोल असणार, याकडे वाहनचालकांचे लक्ष होते. अखेर या सागरी सेतूवरील टोल रक्कम निश्चित करण्यात आली आहे. शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवर 500 रुपयांचा टोल असणार असल्याची चर्चा होती. मात्र, या सागरी सेतूवर 250 रुपयांचा टोल असणार आहे.  आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळली आहे. मुंबई ते अलिबाग हे अंतर या  सागरी महामार्गामुळे अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. पर्यावरणपूरक असा हा सागरी महामार्ग असून बांधकामातील जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरून त्याचे काम करण्यात आले आहे.  ओपन रोड टोलिंग यंत्रणा असलेला देशातील पहिला मार्ग ठरणार असल्याचेही सांगण्यात आलं आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे  12 जानेवारी नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. त्याच वेळी शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूचे उद्घाटन करण्याचे नियोजन आहे. या सागरी सेतूचे काम पूर्ण झाले होते. त्यानंतरही उद्घाटन होत नसल्याने शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. 


प्रवास होणार वेगवान...


देशातील सर्वात लांब समुद्री पूल अर्थातच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आहे. या ट्रान्स हार्बर लिंकमुळे मुंबई ते नवी मुंबई हे अंतर केवळ 20 मिनिटांत पार करता येणं शक्य होणार आहे. हा मार्ग 22 किमी लांबीचा असून जवळपास 18 किमी समुद्रातून आहे. त्याचप्रमाणे  इतर पावणे चार किमीचा मार्ग हा जमिनीवरील आहे. मुंबईतल्या शिवडीतून नवी मुंबईचे अंतर आता अवघ्या 20 मिनिटांत कापता येईल. दुसरीकडे हा मार्ग मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला देखील जोडला जातोय. त्यामुळे मुंबई-पुणे अंतर देखील या मार्गामुळे कमी होण्यास मदत होईल. 


सागरी सेतू प्रकल्पामुळे काय फायदा होणार? 


> नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील प्रदेशाचा भौतिक व आर्थिक विकास मोठ्या प्रमाणावर होणार आहे


> प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाशी वेगवान दळणवळण शक्य होणार आहे. त्याशिवाय, मुंबई पोर्ट व जवाहरलाल नेहरू पोर्ट यांचे दरम्यान वेगवान दळणवळण शक्य होणार आहे. 


> मुंबई, नवी मुंबई, रायगड, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्ग यामधील अंतर सुमारे 15 किमी कमी झाल्यामुळे इंधन, वाहतूक खर्च आणि मौल्यवान वेळेत सुमारे एका तासाची बचत होणार आहे.


> मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.