विक्रोळीत रविवारी (25 मार्च) सकाळी ही घटना घडली. कांजूरमार्गला राहणारा किसन सोनावणे आणि तरुणीचे पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. परंतु मागील महिन्यातच तिने किसनसोबत ब्रेकअप केलं. हाच राग मनात ठेवून तरुणीला धडा शिकवण्यासाठी किसनने रविवारी सकाळी तिला विक्रोळीतील गार्डनमध्ये भेटायला बोलावलं.
मात्र तरुणीने नकार देताच, घरी येऊन तमाशा करण्याची धमकी किसनने दिली. पर्यायी तिने भेटण्यास होकार दिला. ही तरुणी सकाळी दहाच्या सुमारास गार्डनमध्ये पोहोचली.
सुरुवातीच्या बातचीतनंतर दोघांमध्ये भांडणाला सुरुवात झाली. किसनने तिला शांत होण्यास सांगितलं आणि त्यानंतर गोळ्या देण्याचा प्रयत्न केला. ह्या गोळ्या उंदीर मारण्याच्या होत्या. पण तिने ही गोळी खाण्यास नकार दिल्याने किसनने चाकू बाहेर काढून तिच्या गळ्यावर ठेवला. भेदरलेल्या तरुणीने गोळ्या खाल्ल्या. पण गोळ्या खाताच तिला उलट्या होऊ लागल्या. तर किसनने तिथून पळ काढला.
यानंतर बेशुद्धावस्थेत पडलेल्या तरुणीकडे स्थानिकांचं लक्ष गेलं. त्यांनी तिला महात्मा फुले महापालिका रुग्णालयात दाखल केलं.
तरुणीच्या तक्रारीवरुन किसन सोनावणेविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला घरातून अटक केली. तर तरुणीची प्रकृती आता स्थिर आहे, अशी माहिती विक्रोळी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.