मुंबई : टिकटॉक व्हिडीओला विरोध केल्याने एका 15 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना मुंबईत घडली आहे. भोईवाड्यातील राहत्या घरातील बाथरुममध्ये मुलीने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आयुष्य संपवलं.


या मुलीला टिकटॉक अॅपवर स्वत:चे वेगवेगळे व्हिडीओ टाकायचं व्यसन लागलं होतं. त्यातच वडिलांच्या बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत होती. पण हे पाहून आजीने तिला व्हिडीओ टाकण्यास विरोध केला. हाच राग मनात ठेवून तिने आत्महत्या केल्याचं कळतं.

ही मुलगी भोईवाड्यात आई-वडील आणि आजीसोबत राहत होती. तिचे वडील खासगी कंपनीत आहेत, तर ती शाळेत शिकत होती. टिकटॉक अॅपवर व्हिडीओ बनवून ते पोस्ट करायची. त्याला मिळणाऱ्या कमेंट्सची भुरळ पडली आणि व्हिडीओ शेअर करण्याचं तिचं प्रमाण वाढलं. शुक्रवारी (11 जानेवारी) वडिलांच्या वाढदिवस साजरा झाला. त्यावेळई ती मोबाईलवर असल्याचे पाहून आजी ओरडली आणि व्हिडीओ टाकू नको, सांगून मोबाईल काढून घेतला.

याचा राग मनात ठेवून ती बाथरुममध्ये गेली. तिथे ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. बराच वेळ बाहेर न आल्याने कुटुंबीयांना संशय आला आणि ते बाथरुममध्ये गेले. आतून काहीच प्रतिसादन न आल्याने त्यांनी दरवाजा तोडून प्रवेश केला, त्यावेळी ती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली.

कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. तेथे दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर रविवारी (13 जानेवारी) रात्री तिने प्राण सोडले. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. तसंच घटनास्थळावरुन सुसाईड नोट मिळाली नसल्याचंही भोईवाडा पोलिसांनी सांगितलं.