मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णायक ठरु शकणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ताज्या माहितीनुसार, या योजनेची अंदाजित लाभार्थी संख्या 2 कोटी 45 लाखावर पोहचली आहे. यामध्ये ३० ते ४० वयोगटातील महिलांनी सर्वाधिक म्हणजे ९ लाख ८२ हजार ११९ अर्ज भरले आहेत. तर २१ ते ३० वयोगटातील मुलींनी ७ लाख ११ हजार १११ अर्ज भरले आहेत. लाडकी बहीण योजनेच्या (cm ladki bahin yojana) एकूण अर्जदारांपैकी २५ लाख ८६ हजार ८०५ अर्जदार या विवाहित महिला आहेत. यासह अविवाहित महिला- २ लाख ४९ हजार ७१३ अर्ज, विधवा - १ लाख १५ हजार ५४५ अर्ज, घटस्फोटीत ११ हजार ५,अशी मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेसाठी आलेल्या अर्जदारांची आकडेवारी आहे.
पुण्यातून सर्वाधिक महिलांचे अर्ज
लाडकी बहीण योजनेला सर्वाधिक प्रतिसाद पुणे जिल्ह्यातून मिळताना दिसत आहे. पुण्यातील 2 लाख 75 हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले आहेत. तर कोल्हापूरमधूनही 2 लाखांपेक्षा अधिक अर्ज आले आहेत. तर सोलापूर जिल्ह्यातील 1 लाख 66 हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज केले आहेत. अहमदनगरमधील लाडकी बहीण योजनेच्या अर्जदारांचा आकडा 1 लाख 60 हजारांपेक्षा जास्त असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, वाशिम जिल्ह्यातून लाडकी बहीण योजनेला अगदी थंड प्रतिसाद मिळाला आहे. वाशिम जिल्ह्यातून लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अवघे 25 अर्ज आले आहेत.
राज्य सरकारकडून आता लवकरच लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांच्या नावाची यादी प्रसिद्ध केली जाईल. या यादीत नाव असलेल्या महिलांनाच राज्य सरकार महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत देणार आहे. त्यामुळे आता सर्व महिलांचे डोळे लाडकी बहीण योजनेच्या यादीकडे लागले आहे. राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करु शकतात.
लाडकी बहीण योजनेत पाच महत्त्वाचे बदल
1) बदललेला पहिला नियम हा रेशन कार्डसंदर्भात आहे. नवविवाहित महिलेचे नाव लगेच रेशन कार्डवर लावणे शक्य होत नाही. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशनकार्ड हे अत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे.
2) परराज्यात जन्म झालेल्या व संबंधित महिला सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल तसेच या महिलने महाराष्ट्रातील अधिवास असलेल्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर तर अशा बाबतीत महिलेच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते. याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड व 15 वर्षांपूर्वीचे मतदानकार्ड ग्राह्य धरण्यात येणार आहे.
3) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता पोस्टातील बँक खातेदेखील ग्राह्य धरले जाणार आहे.
4) तसेच योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.
5) आता सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगवणवाडी सेविका, आशा सेविका, सेतु सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र यांना महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे. म्हणजेच वर नमूद केलेल्या व्यक्ती, आस्थापना महिलांचे अर्ज भरून घेऊ शकतात.
आणखी वाचा