MPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी
MPSC State Services Mains 2025 Marks Verification: राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या गुणांमध्ये प्रचंड तफावत आढळल्याने आयोगाने उमेदवारांना गुणपडताळणीसाठी 10 सप्टेंबर 2026 पर्यंत अर्ज करण्याची संधी दिली आहे.

MPSC Big Update News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 च्या उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्य परीक्षेच्या गुणांमधील प्रचंड तफावतीबाबत विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर, आयोगाने उमेदवारांना गुणांच्या फेरपडताळणीची संधी उपलब्ध करून दिली आहे.
इच्छुक उमेदवारांना आयोगाने निश्चित केलेल्या ऑनलाईन प्रक्रियेद्वारे 10 सप्टेंबर 2026 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. गुणपडताळणीनंतरची अंतिम परिस्थिती उमेदवारांच्या प्रोफाइलमध्ये थेट कळवली जाईल, असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पष्ट केलं आहे.
MPSC Mains Exam Result : 2, 6 अन् 11 गुण! पारदर्शकतेवर उठले होते प्रश्न
एमपीएससीने 25 ऑगस्ट 2026 रोजी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 च्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर केला होता. या निकालानंतर मुलाखतीसाठी अपात्र ठरलेल्या अनेक उमेदवारांच्या गुणांमध्ये अत्यंत धक्कादायक तफावत दिसून आली.
मुख्य परीक्षेतील काही पेपर्समध्ये उमेदवारांना 250 पैकी अवघे 2,6,11,14 असे नगण्य गुण मिळाले होते. एका उमेदवाराला भाषा, निबंध आणि जीएसच्या सर्व पेपरमध्ये 100 पेक्षा जास्त गुण मिळालेले असताना, वैकल्पिक विषयाच्या एका पेपरमध्ये अवघे 2 गुण देण्यात आल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले.
या प्रकारामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेवर विद्यार्थ्यांनी तीव्र संशय व्यक्त करत एमपीएससीकडे लेखी तक्रारी आणि पुरावे सादर केले होते. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अखेर आयोगाने प्रसिद्धीपत्रक जारी करत गुणपडताळणीचा निर्णय घेतला आहे.
MPSC Controversy On Verification : 'फेरतपासणी' की केवळ 'बेरीज'?
एमपीएससीने गुणपडताळणीची संधी दिली असली तरी, परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये अजूनही असंतोष पाहायला मिळत आहे. आयोगाने उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन किंवा प्रत्यक्ष फेरतपासणी न करता केवळ 'गुणांची फेरपडताळणी' असे नमूद केले आहे. केवळ गुणांची बेरीज करून मूळ त्रुटी दूर होणार नाहीत. ज्या तज्ज्ञांनी किंवा तपासनिसांनी अशा प्रकारे 2 किंवा 6 गुण दिले आहेत, त्या उत्तरपत्रिकांची पारदर्शकपणे प्रत्यक्ष फेरतपासणी व्हावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा उमेदवारांकडून केली जात आहे.
MPSC Important Dates & Process : अर्ज कसा आणि कधीपर्यंत करावा?
अंतिम मुदत: 10 सप्टेंबर 2026 पर्यंत.
अर्ज पद्धत: उमेदवारांनी एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपल्या लॉगीन प्रोफाइलद्वारे विहित शुल्क भरून ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
गुणपडताळणीचा तपशील थेट उमेदवाराच्या प्रोफाइल डॅशबोर्डवर उपलब्ध करून दिला जाणार आहे.
ही बातमी वाचा:
Before You Go
Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!





















