मुंबई : भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आज आझाद मैदानात मराठा आंदोलक तरुणांची भेट घेतली. गेल्या 35 दिवसांपासून सुरु असलेल्या मराठा विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आता सर्वतोपरी प्रयत्न सुरु असल्याचं दिसून येत आहे. छत्रपती संभाजीराजेंनी मराठा आंदोलकांच्या मागण्यांविषयी त्यांच्याशी चर्चा केली. लवकरच आंदोलक तरुणांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक लावणार असल्याचं आश्वासन सभांजीराजेंनी दिलं.


राजकीय नेता म्हणून याठिकाणी आलेलो नाही. शिवाजी महाराज, शाहू महाराज यांचा वंशज म्हणून याठिकाणी आलो आहे. 2014 ला आम्ही नारायण राणे समितीवर दबाव टाकला आणि आरक्षण मिळवून घेतलं होतं. मागच्या सरकारने 2018 ला हा कायदा वैद्य ठरवला. परंतु सरकारी अधिकाऱ्यांनी यामध्ये अडचण निर्माण केली, असं खासदार संभाजीराजेंनी सांगितलं. मी येते मराठा समाजातील आंदोलकांबाबतची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आलो आहे. मागील 35 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. तरीदेखील सरकार निर्णय घेऊ शकत नाही. मराठा आंदोलक तरुणांच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशाराही संभाजीराजेंनी सरकारला दिला.


अजित पवारांसोबतच्या बैठकीनंतरही मराठा आंदोलक आक्रमक; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा


मी तुमच्या सोबत आहे, असंही संभाजीराजेंनी आंदोलक तरुणांना आवर्जुन सांगितलं. आंदोलक तरुणांच्या मागण्याबाबत लवकरात लवकर निर्णय होणे गरजेचं आहे. आज इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग मंत्री विजय वड्डेट्टीवार यांच्यासोबत बैठक आयोजित केली आहे. त्या बैठकीत आम्ही मराठा विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडू. लवकरच आम्ही या विषयाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यांमंत्र्यासोबत बैठक लावणार आहोत, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.


आंदोलकांची आणि त्यांच्या वकिलांची अजित पवारांसोबत बैठक 


त्याआधी आज मराठा आंदोलक तरुणांची आणि त्यांच्या वकिलांची आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक पार पडली. बैठकीत विद्यार्थ्यांनी नियुक्त्यांबाबत घोषणा न झाल्याने नाराजी व्यक्त केली. बैठकीत आंदोलकांच्या वकिलांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात विद्यार्थ्यांना नेमणूक द्याव्यात, आशी मागणी केली. तसेच आंदोलक विद्यार्थ्यांच्या जागेवर जे विद्यार्थी घेण्यात आले आहेत, त्यातील काही जणांना नोकरीत कायमस्वरुपी पदासाठी समाविष्ट करून घेण्यात आले आहे. त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. या मागण्याची तात्काळ दखल घेत अजित पवारांनी संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासाठी प्रधान सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली समिती देखील स्थापन केली आहे.


मुंबईत आझाद मैदानातील मराठा आंदोलकाची प्रकृती बिघडली; गेल्या 34 दिवसांपासून आंदोलन सुरुच


मराठा आंदोलकाची प्रकृती खालावली 


मुंबईतील आझाद मैदान इथं आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकाची प्रकृती खालावलीय. इथं एका आंदोलक तरुणाला भोवळ आलीय. गेल्या 34 दिवसांपासून हे तरुण आझाद मैदानात आंदोलन करतायत आणि सध्या या आंदोलकांनी अन्नत्याग सुरु केलाय. मात्र, या आंदोलकांकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतोय. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाची धार तीव्र करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने मराठा समाजाला एकत्र येण्याचं आवाहन केलय. मुंबईतील आझाद मैदानात मराठा क्रांती मोर्चाचे सर्व समन्वयक मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दाखल होत आहेत. यावेळी या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.


Ajit Pawar Meet Maratha Protesters | अजित पवारांसोबतच्या बैठकीनंतरही मराठा आंदोलक आक्रमक