नवी मुंबई : पोटच्या 10 दिवसांच्या बाळाची विक्री करणाऱ्या मातेला आणि यामध्ये सहभागी होणाऱ्या 4 ऐजंटला एनआरआय पोलिसांनी अटक केली आहे. या बाळाची विक्री अडीच लाख रुपयांना ठरली होती. पोलिसांनी बनावट गिऱ्हाईक बनून रंगेहाथ आरोपींना पैसे घेताना अटक केली आहे. यासंबंधित तक्रार मिळताच पोलिसांनी सापळा रचून आरोपींना रंगेहाथ अटक केली.


आरोपी माता रहीम शेख हिला चार आपत्य
आरोपी माता रहीम शेख हिनं गेल्या 10 दिवसांपूर्वी पाचवे अपत्य म्हणून मुलीला जन्म दिला होता. पतीपासून विभक्त राहत असल्याने पाच मुलांचा सांभाळ कसा करायचा हा प्रश्न तिच्या समोर होता. यामुळे तिने पाचवे झालेले अपत्य विकण्याचा निर्णय घेतला. यातून तिने बाळ विकणाऱ्या व्यक्तिंचा शोध घेतला आणि यासाठी चार लोकांची साखळी तयार झाली.




बाळ विकायचे कुणाला असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्यांनी अनाथ आश्रमात येणाऱ्या व्यक्तींना हेरायचे ठरवले. अनाथ आश्रमातील मुलांना मदत करण्यासाठी आलेल्या अमृता गुजर शेख यांना आरोपींनी बाळ विक्रीबाबत माहिती दिली. यातील एका आरोपीने फिर्यादींना संबंधित बाळ कोणत्याही प्रकारची कायदेशीर प्रक्रिया न करता विकत मिळेल अशी ॲाफर दिली होती. बाळ विक्रीबाबत कळाल्यानंतर जागरुक महिला फिर्यादी अमृता गुजर शेख यांनी एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार दिली. 


पोलिसांनी स्वत: बनावट गिऱ्हाईक बनून बाळ विकत घेण्याचा सापळा रचला. पाच आरोपींनी प्रत्येकी 50 हजार रुपये ठरवून 2.5 लाख रुपयांना बाळ विकण्याचे ठरवले. नेरुळ रेल्वे स्थानकाशेजारी बाळ विकत घेण्यास बोलविण्यात आले. यावेळी रोख 50 हजार स्विकारून बाळाची विक्री करणारी आरोपी माता रहीम शेख आणि इतर चार मध्यस्थी एजंटला पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. सध्या बाळ भिवंडी येथील बाळ कल्याण समितीकडे देण्यात आले आहे, अशी माहिती असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांनी दिली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha