MARD strike call off : NEET PG समुपदेशन आणि इतर मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी पुकारलेला संप मागे घेतला आहे. सोमवारी रात्री राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर राज्यातील निवासी डॉक्टरांची संघटना 'मार्ड'ने संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. NEET PG 2021 Counselling प्रक्रिया जलदगतीने व्हावी यासाठी देशभरातील निवासी डॉक्टरांनी 27 नोव्हेंबरपासून संप पुकारला आहे. त्याला पाठिंबा म्हणून आणि उर्वरित मागण्यांसाठी सोमवारपासून 'मार्ड'ने संप पुकारला होता. 


'मार्ड'ने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत झालेली बैठक सकारात्मक झाली. या बैठकीत मिळालेल्या आश्वसनानंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


महाराष्ट्रात कनिष्ठ निवासी डॉक्टरांची भरती केली जाणार आहे. यामुळे निवासी डॉक्टरांची कमतरता काही प्रमाणात कमी होणार असून रुग्णांना चांगली सेवा देता येणार आहे. . NEET PG 2021 Counselling प्रक्रिया लवकर सुरू व्हावी  यासाठी महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारला विनंती करणार आहे. तर,  राज्याच्या बाजूने अतिरिक्त विलंब टाळण्यासाठी NEET PG समुपदेशनाची प्राथमिक प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. याबाबतच्या पाठपुराव्यासाठी आणि योग्य तयारीसाठी पुढील आठवड्यात बैठक आयोजित करण्यात आली आहे. 


त्याशिवाय, मुंबई महापालिकेच्या 'ऋणानुबंध' विद्यावेतन पुढील महिन्यात दिले जाणार आहे. त्याशिवाय , महापालिकेच्या निवासी वसतिगृहांमध्ये गर्दी टाळण्यासाठी म्हाडाच्या इमारतींमध्ये सुरू असलेल्या वसतिगृहांना मुदतवाढ देण्यावर सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे मार्डने सांगितले. 


देशात निवासी डॉक्टरांच्या एकूण 50 हजार जागा आहेत. राज्यात निवासी डॉक्टरांच्या पहिल्या वर्षाच्या एकूण अडीच हजार जागा आहेत. राज्यात साडे पाच हजारच्या जवळपास निवासी डॉक्टर सध्या कार्यरत आहेत. मात्र पीजी-नीटच्या जागा अद्यापही न भरल्याने निवासी डॉक्टरांवर अधिकचा ताण आला आहे. मुंबईत फक्त ४०० निवासी डॉक्टरांवर रुग्णालयांचा भार आहे. डॉक्टरांची संख्या कमी असल्याने रुग्णसेवा देताना अडचणी येत असल्याचं निवासी डॉक्टरांनी म्हटले.