मुंबई : मुंबईची डेली लाईफ हळूहळू सुरू होतेय मात्र कधीही न झोपणाऱ्या या मायानगरीची ओळख असलेली इथली नाईट लाईफ मात्र पूर्ण ठप्प आहे. दिवसभराचं कामकाज संपवून पब्ज किंवा रेस्टोबारमध्ये मित्रांसोबत हँगआऊट किंवा कुटुंबासह एखाद्या फाईन डाईनमध्ये जाणं याला आजकलच्या तरूणीईची पसंतीची असते. मात्र वाढलेल्या लॉकडाऊनमुळे हा व्यवसाय 60 ते 70 टक्के बंद होण्याच्या मार्गावर आहे.


चार महिन्यांपूर्वी हे चित्र मुंबईकरांसाठी बिलकुल नवं नव्हतं. मुंबईचं नाईट लाईफ हिच मुंबईची खरी ओळख. जगातील इतर कुठल्याही मेगासिटीला लाजवेल असा या मायानगरी मुंबईचा साज असतो. म्हणूनच कधीही न झोपणारं शहर म्हणून मुंबईची जगात ख्याती आहे.

मात्र कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमध्ये ही इंडस्ट्री सध्या पूर्णपणे ठप्प आहे. जिथं रात्रीचा कर्फ्यूच लावलेला आहे तर तिथं नाईट लाईफ कुठून उरणार. तसेच सर्वसामान्य रेस्टॉरंटप्रमाणे 'पार्सल' ही संकल्पानच इथं नाममात्र नसल्यानं यांचा व्यवसाय सध्या पूर्णपणे ओस पडलेला पाहायला मिळतो. रिकाम्या अवाढव्य जागा, पॅक करून ठेवलेलं फर्निचर, बंद पडलेले स्क्रीन्स, म्युझिक सिस्टिम हे सारं पाहून घराचे वासे फिरलेल्या एखाद्या वास्तूप्रमाणे इथली अवस्था अतिशय बोलकी आहे.

बीसीबीचे मालक कुशल संखे यांनी एबीपी माझा सांगितलं की, 'पांच वर्षांसाठी गुंतवणूक केली पण कोरोनाने दोन वर्षातच लाखो रुपयांच कर्ज आमच्यावर झालंय. जागेच्या मालकांनी तीन महिने भाडं घेतलं नाही, मात्र हाॅटेल उघडताच ते ही देणं त्यांना भाग आहे. त्याचबरोबर अनेक अटी शर्तींसह जर हाॅटेल सुरु करण्याची परवानगी देण्यात आली तर व्यवसाय करणे जमणार नाही. अनेक मोठे हाॅटेल बंद झाले आहेत. आणि अनेक बंद होण्याच्या मार्गावर आहेत. सरकारनं काही मदत नाही केली तर जवळ जवळ 60-70 टक्के हाॅटेल मुंबईत बंद होतील, असं त्यांनी म्हटलंय.

दिवसभराचं आपलं काम संपवून वेटिंग लाईनमध्ये उभं राहत एखाद्या पब किंवा रेस्टोबारमध्ये थोडी झिंग अनुभवणं ही बॅचलर्सची तर एखाद्या फाईन डाईनमध्ये म्युझिकचा आस्वाद घेत कुटुंबियांसोबत किंवा आपल्या प्रियजनांसोबत थोडा क्वालिटी टाईम घालवणं याला तरूणाईची पहिली पसंती असते. तरूणाईच्या याच आवडीनिवडी लक्षात घेत गेल्या काही वर्षात ही एक स्वतंत्र इंडस्ट्रीच तयार झाली आहे. इथल्या अँबियन्समुळे सहाजिकच ही ठिकाणं सर्वसामान्य रेस्टॉरंट बारपेक्षा जशी खर्च करणाऱ्याला थोडी खर्चिकच असतात तशी ती ही जागा चालवणाऱ्यालाही बरीच खर्चिक ठरतात. मात्र याला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता अनेक मराठी तरूण नवउद्योजकांनी आपल्या चांगल्या चांगल्या नोकऱ्या सोडून बँकांकडनं भांडवलं मिळवत या व्यवसायात आपले पाय रोवले आहेत.

जर याबाबत सरकारनं तातडीनं काही उपाययोजना केली नाही तर हा व्यवसाय कायमचा बंद करण्याची वेळ आलीय. अशी खंत ठाण्यातील प्रसिद्ध कल्ब XOYO चे मालक मंगेश भोसले यांनी बोलून दाखवली. ‘जागेचं लाखांत असलेलं भाडं, देखभालीचा खर्च, कामगारांचे थकलेले पगार, विजेची भरमसाट बिलं, सरकारचे आणि स्थानिक प्रशासनाचे विविध कर, लायसंन्स फी याचा खर्च. कोणतंही उत्पन्न नसताना हे हत्ती पोसणं भल्याभल्यांनाही शक्य नाही. सध्याच्या परिस्थितीत पाहता हा पसारा आता कायमचा गुंडाळण्याची वेळ आलीय,असं भोसलेंनी सांगितलं.

मुंबईच्या गोरेगावमध्ये फेब्रुवारी 2020 मध्येच 'बोहो' या नावानं एक असंच आलिशान फाईन डाईन अनिकेत पाटील या तरूणानं सुरू केलं. मात्र महिन्याभरातच लॉकडाऊन लागल्यामुळे जम बसायच्या आधिक या ठिकाणी दम निघाल्याची व्यथा अनिकेतनं बोलून दाखवली. अनिकेतनं एबीपी माझाशी बातचीत करताना सांगितलं ‘सरकारनं 7 लाखांच्या घरातील लायंसन्स फी यंदा 8 लाख करून ठेवलीय. ती हफ्त्यांत भरायची मुभा जरी दिली असली तरी त्यासाठी पैसा आणायचा कुठून हाच मोठा प्रश्नय. एकतर लवकरात लवकर पूर्ण व्यवसाय सुरू करावा लागेल, जे सध्याच्या परिस्थितीत शक्य दिसत नाही. अथवा याला कायमचा रामराम करण्याची तयारी केल्याची भावना अनिकेतनं बोलून दाखवली.

साल 2018-2019 एनआरएआयच्या डेटानुसार

देशात हाॅटेल इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या 73 लाख आहे. भारतीय रेल्वेच्या 60 टक्के कर्मचारी संख्या इतकी.

मुंबईत जवळ जवळ 7 लाख लोक या इंड्स्ट्रीमध्ये काम करतात.

मुंबईत मोठे आलिशन पब, क्लब रेस्टो बार, लाउंज यांची संख्या 250 पेक्षा जास्त आहेत.

देशभरामध्ये पब, क्लब, रेस्टो बार,लाउंज, स्पोर्ट्स बार, आलिशान रेस्टॉरेंट अशी संघटित फूड सर्व्हिस इंडस्ट्रीचे जवळ जवळ 35% मार्केट आहे.

साल 2018-2019 मध्ये या इंडस्ट्रीनं 18000 कोटीचा महसुल सरकारला दिला, यातून 34 टक्के महसुल पब, क्लब, रेस्टो बार,लाउंज यांच्या व्यवसायानं सरकारला दिला.

केवळ मुंबईतच या कोरोना काळात 50000 कोटींचं नुकसान इंडस्ट्रीला झाल्याच कळतंय.

मुंबईच्या नाईट लाईफशी संबंधित असलेल्या या व्यवसायांकडे वळलेल्या या तरूण नवउद्योजकांना आता अपेक्षा आहे, ती सरकारच्या पाठिंब्याची. खरंतर हे व्यवसाय सरकारला सर्वात जास्त महसूल मिळवून देतात. त्यामुळेच यांच्यावर सर्वाधिक कर आकारला जातो. त्यामुळे यंदा किमान याकाळातील लायसंन्स फी माफ करत जर जीएसटीमध्येही सरकारनं थोडी सवलत दिली तरच हे व्यवसाय इथं टिकू शकतील नाहीतर मुंबई पुन्हा किमान 10 वर्ष मागे गेल्याशिवाय राहणार नाही,अशी या व्यावसायिकांची भावना आहे.