मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र पसरला असून महत्वाच्या कामासाठीच लोकांनी घराबाहेर पडण्याचं आवाहन वारंवार प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तरी सुद्धा या आवाहनासा आणि नियमांना हरताळ फासण्याचं काम केलं जातंय. आरे कॉलोनीमध्ये काही जण लॉकडाऊनचे नियम धुडकावून पार्टी करताना आढळले आहेत. तिथं पार्टी करणाऱ्या 33 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये संचारबंदी आणि कुठल्याही प्रकारच्या सार्वजनिक आयोजनांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरी सुद्धा लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवून ही लोकं पार्टी करत होती.

आरे कॉलोनीतील रॉयल पालमसमध्ये शनिवारी संध्याकाळी ही पार्टी सुरू होती. ही लोकं विकेंडसाठी येथे जमली होती. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना फोन करून पार्टी सुरू असल्याची माहिती दिली. ज्यानंतर पोलीस तात्काळ त्या ठिकाणी पोहचले आणि कारवाई केली. पार्टीच्या वेळी नियमांची सपशेल पायमल्ली झाल्याचं चित्र होतं. सुरक्षित अंतर नाही, तसंच मास्क घातले गेले नव्हते. ही लोकं मुंबईच्या विविध भागातून आली होती. तर काही जण गुजरात मधून आल्याचं कळत आहे.

काही दिवसांपूर्वी वांद्रे जिमखान्याचा 85 वा वर्धापण दिन होता. जो साजरा करण्यासाठी जिमखान्यातील सभासद एकवटले होते. त्यावेळी सुद्धा नियमांची अशाच प्रकारे पायमल्ली करण्यात आली होती. या संदर्भात मुंबई पोलिसांनी जिमखान्याच्या अध्यक्षांसह 15 सभासदांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आतापर्यंत 188 अंतर्गत मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेली कारवाई

  • 30436 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  •  4287 आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

  •  9863 लोकांना नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.

  •  16286 आरोपींना अटक करून जामिनावर सोडण्यात आलं आहे.


या सर्व कारवाया लॉकडाऊनमध्ये ज्यांनी लॉकडाऊनचे नियम मोडले त्यांच्याविरोधात करण्यात आल्या आहेत. देशात सर्वात जास्त कोरोना रुग्ण महाराष्ट्र आहेत आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्यात लोकांकडून लॉकडाऊनचे नियम मोडले जात आहेत.